ईदपासून ते दिवाळीपर्यंत
बड्या सिनेमांच्या क्लॅशची सुरुवात ईदपासून होणार आहे. यादिवशी सलमान खानचा ‘राधे’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ आमने सामने येणार आहेत. यानंतर २५ जूनला रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ आणि हॉलीवूडच्या सुपर हिट फ्रेंजाईजीचा ‘फास्ट अँड फ्युरियस ९’ प्रदर्शित होईल. ३० जुलैला सुपरस्टार प्रभासचा ‘राध्ये श्याम’ च्या विरुद्ध संजय लीला भन्साळीचा आलिया भट अभिनित ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. अजय देवगणचा ‘आरआरआर’ १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल तर त्याचाच ‘मैदान’ हा चित्रपट १५ ऑक्टोबरला चित्रपटगृहात येईल. दिवाळीला अक्षयकुमारच्या ‘पृथ्वीराज’ चा सामना शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ या सिनेमाशी होईल.
चित्रपटांची टक्कर होणारच
चित्रपटांच्या क्लॅशबद्दल बोलत असताना पीव्हीआर पिक्चर्सचे सीईओ कमल ज्ञानचंदानी सांगतात की, ‘अनेक सिनेमांचं शूटिंग पूर्ण होऊन ते प्रदर्शनासाठी तयार आहेत. तर काही चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे; यामुळे प्रदर्शनाच्या तारखा क्लॅश होणार हे नक्की आहे. निर्माते आणि प्रदर्शक एकमेकांच्या व्यवस्यावर परिणाम होऊ नये यासाठी चित्रपटांची होणारी टक्कर टाळण्याचा प्रयत्न करतील. पण ते पूर्णपणे टाळणं कठीण असेल.
सिनेमांचा बिझनेस गाठणार उंची
जाणकारांच्या मते करोनानंतर चित्रपटांचा व्ययसाय आधीपेक्षाही जास्त उंची गाठणार आहे. पीव्हीआर सिनेमाचे चीफ ग्रोथ अँड स्ट्रॅटेजी ऑफिसर प्रमोद अरोरा सांगतात की, ‘चित्रपट प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सिनेमांचा बिझनेस आधीपेक्षा जास्त चांगला होईल.’ यावर ट्रेंड ॲनालिस्ट जोगिंदर टुटेजा सांगतात की, ‘चित्रपटांची टक्कर सध्या तरी कमी होताना दिसतेय. कारण आताशी मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अजून कमी आणि मध्यम बजेटच्या सिनेमांच्या तारखांची घोषणा व्हायची आहे. त्याची घोषणा होईल तेव्हा तीन ते चार सिनेमांमध्ये क्लॅश होईल. प्रेक्षकांसाठी ही चांगली गोष्ट असून त्यांच्याकडे एका वेळी अनेक पर्याय असतील.’
होणार खूप क्लॅश
गेल्या वर्षीचा बॅकलॉग यावर्षी चित्रपटगृहांत पाहायला मिळेल. गेल्या वर्षीच्या चित्रपटांत यावर्षीच्या चित्रपटांची भर पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सिनेमांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्लॅश होणार आहे.
– योगेश रायजादा, व्हाईस प्रेसिडेंट, वेब सिनेमाज
टक्कर होणाऱ्या सिनेमांची यादी
१३ मे – राधे युवर मोस्ट वाँटेड भाई, सत्यमेव जयते २
२५ जून – शमशेरा, फास्ट अँड फ्युरियस ९
३० जुलै – राधे श्याम, गंगुबाई कठियावाडी
१३ ऑगस्ट – ॲटॅक, पुष्पा
१५ ऑक्टोबर – मैदान, आरआरआर
५ नोव्हेंबर – पृथ्वीराज, जर्सी
संकलन : प्रथमेश गायकवाड, विल्सन कॉलेज