Home ताज्या बातम्या मराठा आरक्षणावर तोडगा?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधानांची भेट

मराठा आरक्षणावर तोडगा?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधानांची भेट

0
मराठा आरक्षणावर तोडगा?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधानांची भेट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणाबरोबरच इतर महत्त्वाच्या विषयांवर उभयतांमध्ये चर्चा होणार असल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी आणि ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून, उद्धव ठाकरे यांना आज, मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. यावेळी आघाडी सरकारमधील काही मंत्री त्यांच्यासोबत असतील, असे समजते.

जयंत पाटील यांचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. ‘मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरांतून, वेगवेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, आता संसदेत याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी आग्रह करणार आहे’, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली होती.

Source link