इटलीचे माजी खेळाडू लिओनार्डो बोनुसी म्हणाले, ‘या युरोपीयन चॅम्पियनशिप स्पर्धेची आम्ही वर्षभरापासून वाट पाहत आहोत. स्टेडियममध्ये १५ हजार प्रेक्षक देशाचे राष्ट्रगाण गातील, या क्षणासाठी आम्ही आतूर झालो आहोत. फुटबॉलप्रेमी स्टेडियममध्ये जाऊल लढत बघण्यास उत्सुक आहे.’ इटलीला २०१८च्या वर्ल्ड कपमध्ये पात्र ठरता आले नव्हते. मात्र, यानंतर युरोच्या पात्रता फेरीतील दहाच्या दहाच्या लढती इटलीने जिंकल्या. सलग २७ लढतींत अपराजित राहून इटलीने युरो कपमध्ये प्रवेश केला आहे. आता या कामगिरीत सातत्य राखण्याचा इटलीचा प्रयत्न असेल.
जागतिक फुटबॉल क्रमवारीत इटली सातव्या क्रमांकावर असून, तुर्की २९व्या क्रमांकावर आहे. ‘अनुभव हीच आमची जमेची बाजू आहे. या जोरावर कुठल्याही संघाचा सामना करण्याची आमची तयारी आहे. आमच्या संघात भलेही रोमेलू लुकाकू किंवा ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखे खेळाडू नसतील. मात्र, संघ हीच आमची जमेची बाजू आहे,’ असे तुर्की संघाचे प्रशिक्षक सेनोल ग्नेस यांनी म्हटले आहे. पात्रता फेरीत तुर्कीने फ्रान्सला पराभूत केले आहे. गटात दुसऱ्या क्रमांकावर राहून तुर्कीने युरो कपमध्ये प्रवेश केला आहे.
वाचा- लग्नानंतर रोहित शर्माने केली होती मोठी चूक; पाहा विराटने कसा घेतला फायदा
युरो कप फुटबॉल स्पर्धा ११ जूनपासून सुरू होत आहे. युरो कप स्पर्धेला १९६० पासून सुरुवात झाली. यापूर्वी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त दोन देश यजमान होते. मात्र, या वेळी युरोपमधील करोनास्थितीमुळे या स्पर्धेचे अकरा जण यजमान आहे. ‘मिनी वर्ल्ड कप’ म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा गेल्या वर्षी करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे या स्पर्धेचे नाव युरो २०२० असेच असेल. या स्पर्धेत एकूण २४ संघ सहभागी झाले आहेत. युरोपातील अनेक दिग्गज फुटबॉलपटूंचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
स्पर्धा कालावधी : ११ जून ते ११ जुलै
स्पर्धा यजमान : अझरबैजान, डेन्मार्क, इंग्लंड, जर्मनी, हंगेरी, इटली, नेदरलँड्स, रोमानिया, रशिया, स्कॉटलंड आणि स्पेन या अकरा शहरांत होणार आहे.
दृष्टिक्षेप…
– जर्मनी, स्पेन यांनी ही स्पर्धा प्रत्येकी तीन वेळा जिंकली असून, फ्रान्सने दोन वेळा जिंकली आहे.
– इटली, पोर्तुगाल, नेदरलँड्स, ग्रीस, डेन्मार्क, चेक प्रजासत्ताक, सोव्हिएत युनियन यांनी प्रत्येकी एकदा करंडक उंचावला आहे.
– मागील स्पर्धा (२०१६) पोर्तुगालने जिंकली होती.
– या स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम फ्रान्सच्या मायकेल प्लाटिनी आणि पोर्तुगाल ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आहे. दोघांनी प्रत्येकी नऊ गोल केले आहेत.
सहभागी संघ : २४
गट
अ : तुर्की, इटली, वेल्स, स्वित्झर्लंड
ब : डेन्मार्क, फिनलँड, बेल्जियम, रशिया
क : नेदरलँड्स, युक्रेन, ऑस्ट्रिया, नॉर्थ मेकॅडोनिया
ड : इंग्लंड, क्रोएशिया, स्कॉटलंड, चेक प्रजासत्ताक
इ : स्पेन, स्वीडन, पोलंड, स्लोवाकिया
एफ : हंगेरी, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी
करोनामुळे नियम बदल
– पाच राखीव खेळाडूंचा वापर करता येणार. पूर्वी तीनच राखून खेळाडू होते.
– पूर्ण वेळेनंतर एक्स्ट्रा टाइममध्ये लढत गेल्यास सहावा राखीव खेळाडूचाही वापर करता येणार.
– एका संघांत २६ खेळाडूंच्या सहभागाला परवानगी.
– करोनामुळे लढत होऊ शकली नाही, तर ४८ तासांत सर्व पर्यायांचा वापर केला जाईल. तरीही लढत होऊ शकली नाही, तर ज्या संघामुळे ही वेळ आली, त्याला संघाला ३-०ने पराभूत समजले जाईल.
संभाव्य विजेते संघ
बेल्जियम : फिफा जागतिक क्रमवारीत अव्वल. गेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. अद्याप संघाला एकदाही जेतेपद मिळविता आलेले नाही. केविन डी ब्रुयेनकडून अपेक्षा.
फ्रान्स : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी. गेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोर्तुगालकडून पराभव पत्करावा लागला होता. फ्रान्सने १९८४ आणि २०००मध्ये स्पर्धा जिंकली आहे. कायलिन एम्बापेसह अनेक चांगले खेळाडू संघात.
इंग्लंड : जागतिक क्रमवारीत चौथा. गेल्या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीतूनच बाहेर. अद्याप एकदाही जेतेपद नाही. हॅरी केन काय कमाल दाखवितो, याकडे लक्ष.
पोर्तुगाल : जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर. गेल्या स्पर्धेचा विजेता. सलग दुसऱ्यांदा युरो कप उंचाविण्याची संधी. ख्रिस्तियानो रोनाल्डोला सर्वाधिक गोलचा विक्रम करण्यासाठी केवळ एक गोलची गरज.
स्पेन : जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर. गेल्या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीतूनच बाहेर. १९६४, २००८, २०१२चा विजेता. सर्जिओ बॅस्क्वेट्सकडून अपेक्षा.
इटली : फिफा क्रमवारीत सातव्या क्रमांकावर. गेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. १९६८चा विजेता. २२ वर्षीय गिअँलुगी डोनारुमा हा उत्कृष्ट गोलकीपर संघाला लाभला आहे.
जर्मनी : जागतिक क्रमवारीत बारावा. गेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत. १९७२, १९८०, १९९६चा विजेता. प्रशिक्षक जॉकिम लोव काय कमाल दाखवितात, याकडे लक्ष.
उद्घाटनाचा सामना
तुर्की वि. इटली
सामन्याची वेळ : १२ जून (मध्यरात्री १२.३० पासून)
स्थळ : रोम
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स