शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं.
चित्रपट सर्वार्थानं तयार आहे, पण करोनाचं सावट अद्याप गडद असल्यानं रसिकांना थोडी कळ सोसावी लागणार आहे. सिनेमागृहांचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याचे आदेश मिळताच ‘पावनखिंड’च्या प्रदर्शनाची योजना आखण्यात येणार असून, या चित्रपटातील वैशिष्ट्यं टप्प्याटप्प्यानं रसिकांसमोर येणार आहेत. ‘पावनखिंड’ हा चित्रपट दिग्पालनं संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील तिसरं पुष्प आहे. या पुष्पमालेतील ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. लवकरच पावनखिंडीतील तो थरार आणि पराक्रम सिनेरसिकांना चित्रपटगृहांमध्ये अनुभवायला मिळणार आहे.