Home बातम्या राष्ट्रीय कुमारस्वामी सरकारची आता सोमवारी ‘अग्निपरीक्षा’

कुमारस्वामी सरकारची आता सोमवारी ‘अग्निपरीक्षा’

कुमारस्वामी सरकारची आता सोमवारी ‘अग्निपरीक्षा’बेंगळुरू : 

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारवरचं संकट तूर्त टळलं आहे. कर्नाटक विधानसभेत आजही विश्वासदर्शक ठरावावर मतदान झालं नाही. सभापतींनी सोमवारपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब केल्याने आता सोमवारीच कुमारस्वामी सरकारच्या भवितव्याचा फैसला होणे अपेक्षित आहे. दरम्यान, आमचं सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाईल, असे काँग्रेस विधीमंडळ नेते एस. सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. 

कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला बहुमताची अग्निपरीक्षा द्यावी लागणार असून विधानसभेचे सभापती के. आर. रमेश हे आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतील, अशी अपेक्षा होती. राज्यपाल वजुभाई वाला यांनी मतदानासाठी आधी आज दुपारी दीड वाजेपर्यंतची मुदत दिली होती मात्र ही वेळ टळून गेली. त्यानंतर राज्यपालांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्याची सूचना सभापतींना चिठ्ठीद्वारे केली. मात्र सभापतींनी त्यावर कोणतीच कृती न करता आपल्या अधिकारात सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केलं आहे. आता सोमवारी सकाळी ११ वाजता सभागृहाचं कामकाज सुरू होणार असून विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा पुढे सुरू राहणार आहे. या चर्चेअंती सोमवारीच या ठरावावर मतदान होऊन कर्नाटकातील सत्तानाट्याचा फैसला होणे अपेक्षित आहे. 

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राज्यपालांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राज्यपालांकडून विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप होत आहे, असे नमूद करत बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून देण्यात आलेल्या डेडलाइनला कुमारस्वामींनी आक्षेप घेतला आहे. राज्यपालांचा हस्तक्षेप सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या आदेशाचं उल्लंघन करणारा आहे, असा दावाही कुमारस्वामी यांनी याचिकेत केला आहे. सुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील १५ बंडखोर आमदारांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी दिली आहे. हा आदेशही स्पष्ट करून सांगावा, अशी विनंती कुमारस्वामी यांनी केली आहे.