हायलाइट्स:
- सुशांतसिंह राजपूतचा पहिला स्मृतीदिन
- आईच्या खूप जवळ होता सुशांत
- आईने केलेला नवस १७ वर्षांनंतर सुशांतने पूर्ण केला
सुशांत आपल्या आईशी खूप जवळ होता. तिच्या निधनानंतर तो एकाकी पडला होता. त्याने सोशल मीडियावर जी शेवटची पोस्ट केली होती ती देखील आईशी निगडीतच होती. आईच्या निधनानंतरही तिच्या आठवणी कायम त्याच्यासोबत होत्या. सुशांतचे आयुष्य मार्गी लागावे आणि जीवनात तो यशस्वी व्हावा, यासाठी त्याच्या आईने नवस केला होता. त्याबद्दल सुशांतला जेव्हा समजले तेव्हा, तो नवस फेडण्यासाठी म्हणून अभिनेता आवर्जून त्याच्या मूळगावी गेला होता. ज्यावेळी सुशांत त्याच्या मूळ गावी गेला, तेव्हा तो खूपच लोकप्रिय झाला होता.
काय केला होता नवस
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘छिछोरे’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सुशांत त्याच्या गावाला गेला होता. त्यावेळचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुशांत तेव्हा बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील बोरने या गावात होता. हे त्याच्या वाडवडिलांचे मूळ गाव होते. या गावातील भगवती देवीकडे सुशांतच्या आईने नवस केला होता. सुशांतचे आयुष्य चांगले मार्गी लागावे आणि त्याला यश, प्रसिद्धी मिळावी यासाठी देवीला तिने नवस केला होता.
या सिनेमाच्या चित्रीकरणाला जेव्हा सुशांत बिहारमध्ये होता तेव्हा तो आवर्जून या देवीच्या मंदिरामध्ये गेला. तिथे जाऊन सुशांतने मुंडण विधी देखील केला होता. अर्थात त्यावेळी संपूर्ण केस काढण्याऐवजी शास्त्र म्हणून थोडेसे केस त्याने कापले. तब्बल १७ वर्षांनंतर सुशांतने त्याच्या आईची इच्छा पूर्ण केली. त्यावेळी त्याने सांगितले की, ‘मला माझ्या आईबद्दल आणि देवी आईविषयी खूप प्रेम आणि आदर आहे. त्यामुळेच मी १७ वर्षांनंतर येथे आलो आहे.’
सुशांत १६-१७ वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. सुशांत त्याच्या आईशी खूपच जवळ होता. त्यामुळे तिच्या अचानक जाण्याने तो अगदी एकटा झाला होता. त्याचा हा एकटेपणा शेवटपर्यंत त्याच्यासोबत होता.