अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. त्यावरून विरोधकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. शिवसेनेनंही यावरून भाजपवर निशाणा साधत चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळं संतापलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा निषेध करण्यासाठी दादर येथील शिवसेना भवनासमोर ‘फटकार मोर्चा’चं आयोजन केलं होतं. भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाची माहिती मिळाल्यानं शिवसैनिक आधीच शिवसेना भवनासमोर जमले होते. संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली होती. भाजपचा मोर्चा शिवसेना भवनापासून बऱ्याच दूर अंतरावर अडवण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते शिवसेना भवनावर जाण्याचा हट्ट धरत होते. मात्र, पोलीस त्यांना जाऊ देत नव्हते. त्यामुळं काही कार्यकर्त्यांनी जमिनीवर बसकन मारली व ‘जय श्रीराम’ अशी घोषणाबाजी सुरू केली. अनेक कार्यकर्त्यांच्या हातात ‘सोनिया सेना’ असं लिहिलेले पोस्टर होते. घोषणाबाजी व पोस्टरबाजीतून वाद वाढू नये म्हणून पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन जात असताना शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याचवेळी, काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचंही बोललं जात आहे. तसा आरोप भाजपनं केला आहे. शिवसैनिकांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना काठीनं मारल्याचा आरोप भाजपनं केला आहे.
Live: संभाजीराजेंनी उद्याच मुख्यमंत्र्यांना भेटावं – सतेज पाटील