Home ताज्या बातम्या मुंबईकरांकडून करोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन; डॉक्टारांनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबईकरांकडून करोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन; डॉक्टारांनी दिला ‘हा’ सल्ला

0
मुंबईकरांकडून करोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन; डॉक्टारांनी दिला ‘हा’ सल्ला

म. टा. विशेष प्रतिनिधी

मुंबई : करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली तरीही, अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही. तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक मुंबईकर मात्र जणू करोना संसर्ग संपला आहे, आता तिसरी लाट येणारच नाही, अशा आविर्भावात वावरताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या बेजबाबदार सामाजिक वर्तनामुळे हे मुंबईकर स्वतःसह इतरांचा जीवही धोक्यात घालू शकतात. त्यामुळे करोनाला रोखणाऱ्या निर्बंधांचे पालन न करणाऱ्या मुंबईकरांना डॉक्टरांनी ‘जरा स्वतःला आवरा’ असा सल्ला दिला आहे.

जगभरामध्ये करोना संसर्गाच्या एकामागून एक लाटा येत आहे. करोना प्रादुर्भावाचा धोका टळलेला नाही. संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. राहुल मोहिते यांनी सांगितले, की ‘सध्या अनेक जण नियम तोडून कसेही वागत आहे. हे धोकादायक आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेने वेग धरला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये लसीकरणामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. करोनापासून प्रतिबंध होण्यासाठी मदतही होईल. इतर साथींच्या आजारांचा जोर जसा कमी होत जातो, तसा हा जोरही कमी होईल. मात्र त्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ते झाले नाही, तर करोनाचा संसर्ग अधिक वेगाने वाढेल.’ वैद्यकीय अधिकारी डॉ. वसु नायर यांनी, अनेकांच्या मनातून लसीकरणानंतर करोनाची भीती निघून गेली आहे. धास्ती निघून जाणे ही चांगली गोष्ट असली, तरीही बेजाबदार वर्तनामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याच्या टास्क फोर्ससह सर्वच क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांनी संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरणानंतरही मास्क घालणे, हात सतत धुणे, अंतर ठेवून राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे पालन होताना दिसत नाही’, या मुद्द्यांकडे लक्ष वेधले.

संसर्ग रोखायचा तर…

मुंबईसह इतर भागांतील लॉकडाउन टप्प्याटप्याने उठवण्यामागे करोनाचा कमी होत गेलेला संसर्ग, कमी होत गेलेली रुग्णसंख्या, सामान्यांचे होणारे हाल तसेच आर्थिक नुकसान या प्रत्येक बाबींचा सरकारने गांभीर्याने विचार केला आहे. त्यामुळे जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने वागण गरजेचे आहे, असे आवाहन ‘उर्जा’ सामाजिक संस्थेच्या प्रगती पवार यांनी केले आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या संसर्गाला मुलांपासून लांब रोखून धरायचे असेल तर कुटुंबातील, समाजातील प्रत्येकाने पालकांची भूमिका बजावणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Source link