Home ताज्या बातम्या विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर…; वर्धापन दिनी शिवसेनेचा विरोधकांना सूचक इशारा

विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर…; वर्धापन दिनी शिवसेनेचा विरोधकांना सूचक इशारा

0
विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर…; वर्धापन दिनी शिवसेनेचा विरोधकांना सूचक इशारा

हायलाइट्स:

  • शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन
  • करोनामुळं शिवसेनेच्या कार्यक्रमावर निर्बंध
  • सेनेचा भाजपला सूचक इशारा

मुंबईः ‘महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे. पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कोणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर हर हर महादेवचा गजर करत तिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत,’ असा शब्दांत शिवसेनेनं विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.

शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन आहे. या निमित्त शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेची भूमिका आणि पुढील वाटचालीवर भाष्य केलं आहे. तसंच, विरोधी पक्षाला सज्जड दमही भरला आहे. तसंच, ‘शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती ५५ वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील,’ असा ठाम विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे.

वाचाः महिलांसाठी लोकल आधी सुरु होणार?; चहल यांनी दिली मोठी माहिती

‘महाराष्ट्राने अनेक संकटे छाताडावर घेतली. अनेक लढाया पचवल्या. राजकीय, सामाजिक लढ्यांत असंख्य बलिदानेही दिली, पण कोरोनाची पहिली लाट, मग दुसरी लाट, आता म्हणे तिसरी लाटही दारावर धडका देत आहे. या लाटांनी आम्ही सगळय़ांनीच आपले आप्तस्वकीय, मित्रपरिवारांतले जवळचे लोक गमावले. त्या सगळ्या संकटांवर आणि मृत्यूच्या तांडवावर महाराष्ट्राने जितक्या लवकर नियंत्रण मिळवले तेवढे ना केंद्राला जमले, ना इतर राज्यांना करता आले. गंगेत तरंगणारी प्रेते, गुजरातेत स्मशानाबाहेरील अॅम्ब्युलन्सच्या रांगा, सामुदायिक चिता यांचे फोटो जगभरात गेले. देशाची प्रचंड मानहानी झाली. पण या बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला. तो फक्त महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री दमदारपणे कर्तव्य बजावत असल्यामुळेच,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘शिवसेना स्थापन करतानाच शिवतीर्थावरील पहिल्याच विराट सभेत शिवसेनाप्रमुखांनी एक मंत्र दिला, तोच महाराष्ट्राचा भक्कम पाया आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ‘मराठा-मराठेतर, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी, घाटी-कोकणी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारू!’ या एकजुटीच्या वज्रमुठीतच शिवसेनेच्या ५५ वर्षांचे सार सामावलेले आहे. शिवसेनेचे मराठीपण जसे तळपणाऱ्या तेजासारखे आहे तसेच हिंदुत्वाचे कवचही बुलंद आहे. शिवसेनेने आपले रंग सरडय़ासारखे बदलले नाहीत. कष्टकरी, शेतकरी, नोकरदारवर्गाने शिवसेनेला भरभरून पाठबळ दिले ते याच सचोटीच्या राजकारणामुळे,’ असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

Source link