Home ताज्या बातम्या ‘म्युकरचा समावेश गंभीर आजारांत करा’

‘म्युकरचा समावेश गंभीर आजारांत करा’

0
‘म्युकरचा समावेश गंभीर आजारांत करा’

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

म्युकरमायकोसिस या आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत तातडीने समावेश करावा, अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख आणि सरचिटणीस अविनाश दौंड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी एका निवेदनाद्वारे केली.

सध्याच्या परिस्थितीत म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य गंभीर आजाराची लागण वाढीस लागली आहे. या आजाराच्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देण्याची सुविधा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले आहे. मात्र, अजूनही करोनाबाधित रुग्णांवर उपचार मोठ्या संख्येने सुरू आहेत. यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. अशा रुग्णांमध्ये राज्य सरकारी कर्मचारीदेखील आहेत. खासगी रुग्णालयातील अशा विकाराच्या वैद्यकीय उपचाराची खर्च प्रतिपूर्ती मिळण्यासाठी या आजाराचा गंभीर आजाराच्या यादीत समावेश करणे आवश्यक आहे. विविध २७ गंभीर आजारांच्या उपचारासोबतच म्युकरमायकोसिसवरील उपचाराचा खर्च सरकारी कर्मचाऱ्यांना यामुळे मिळू शकेल, असे दौंड म्हणाले. करोना साथरोगाचा गंभीर आजारांच्या यादीत समावेश करण्यात आला असून, त्याच धर्तीवर म्युकरमायकोसिस आजाराचाही त्या यादीत समावेश करणे गरजेचे आहे, असे सरदेशमुख म्हणाले.

Source link