हायलाइट्स:
- अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या.
- मुंबई, नागपुरात धाडसत्रानंतर ईडीच्या कारवाईला वेग.
- कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना १ जुलैपर्यंत कोठडी.
वाचा:सरनाईकांच्या लेटरबॉम्बचे हादरे?; मुख्यमंत्री भेटीनंतर राऊतांचे मोठे विधान
सचिन वाझे करवी अनिल देशमुख हे पैसे वसुली करायचे असा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी दाखल गुन्ह्यात ईडी मार्फतही तपास सुरू आहे. ईडीच्या पथकाने शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील ठिकाणांवर छापे टाकले. त्याचवेळी पालांडे आणि शिंदे यांचीही झडती घेण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी रात्री या दोघांना प्रथम ताब्यात घेण्यात आले व नंतर अटक करण्यात आली. या दोघांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले असता १ जुलैपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. कोठडीबाबत कोर्टात सुनावणी झाली तेव्हा ईडीच्या वकिलांनी पालांडे व शिंदे हे वसुलीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत होते, असा दावा केला आहे. सचिन वाझे या दोघांकडे पैसे पोहचते करायचा असेही ईडीचे म्हणणे आहे.
वाचा: कोविड नियम मोडून वाढदिवस; आमदार संग्राम जगताप गोत्यात
दरम्यान, पालांडे आणि शिंदे यांच्या अटकेनंतर अनिल देशमुख यांच्या अटकेची शक्यता आता बळावत चालली आहे. ईडीने आज अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र देशमुख आज चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्याऐवजी देशमुख यांचे वकील जयवंत पाटील ईडी कार्यालयात पोहचले. त्यांनी ईडीकडे एक अर्ज सादर करत चौकशीसाठी नवीन तारीख देण्याची विनंती केली. ईडी मार्फत नेमकी कोणत्या बाबतीत चौकशी सुरू आहे हे आम्हाला कळले पाहिजे. त्यासाठी संबंधित तपशील आम्हाला द्यावा, असे आम्ही अर्जात नमूद केले असून यावर ईडीच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.
वाचा: ‘या’ जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ७ रुग्ण; निर्बंधांबाबत उचललं ‘हे’ कठोर पाऊल
नेमकं काय आहे प्रकरण?
अँटिलिया स्फोटकं प्रकरणी तपासातील त्रुटींवर बोट ठेवत मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी हा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत गंभीर आरोप केले. सिंग यांनी मुख्यमंत्री व राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले आहे, असा दावा केला. याच आरोपाच्या आधारे मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने देशमुख व इतरांची सीबीआय चौकशी सुरू असून यात ईडीकडूनही समांतर तपास सुरू आहे.
वाचा: ‘आकडेवारी लपवली त्या राज्यांत मृतदेह गंगाकिनारी साचले’