हायलाइट्स:
- अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार.
- महाविकास आघाडी सरकारमध्ये घडामोडींना वेग.
- मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शरद पवार वर्षा निवासस्थानी.
वाचा: करोनाचा धोका आहे, चौकशीला हजर राहू शकत नाही; देशमुखांचं ईडीला उत्तर
केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात होत असलेल्या तपासावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. त्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्य सरकारमधील एक प्रमुख मंत्री अनिल देशमुख गोत्यात आल्याने हा संघर्ष अधिकच धारदार बनत चालला आहे. अनिल देशमुख हे सचिन वाझे करवी पैसे वसुली करायचे. वाझेला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते, असा आरोप सिंग यांनी केला असून त्याबाबत कोर्टाच्या आदेशाने केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत. ईडी मार्फत देशमुख व त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असून अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पालांडे यांना २५ जून रोजी अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावले पण देशमुख ईडी कार्यालयात हजर झालेले नाहीत. त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली आहे. ती देण्यात आली आहे. चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे. या चौकशीनंतर पुढे काय, हा महाविकास आघाडीसाठी आताचा सर्वात कळीचा प्रश्न आहे. याप्रकरणी तक्रारदार असलेल्या अॅड. जयश्री पाटील यांनी कालच देशमुख यांना अटक होईल असा दावा केला आहे. ईडीकडे मी सर्व पुरावे दिले असून देशमुख यांना नक्कीच अटक होणार आहे, असे त्या म्हणाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची खलबतं सुरू झाली आहेत. अनिल देशमुख यांच्यासारख्या गृहमंत्री राहिलेल्या नेत्याला अटक झाल्यास सरकारसाठी तो मोठा धक्का ठरेल, हे सर्वच नेत्यांना माहीत असून त्याअनुषंगानेच ही धावपळ सुरू आहे.
वाचा:हे चालणार नाही; इमारत दुर्घटनांवरून कोर्टाचे BMC, सरकारला खडेबोल
एकीकडे महाविकास आघाडीतील महत्त्वाचा दुवा असलेले संजय राऊत हे मातोश्री आणि सिल्व्हर ओक गाठून उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करत असतानाच आज वर्षा निवासस्थानी या चर्चेचा केंद्रबिंदू सरकला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वर्षा येथे पोहचले असून मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे शरद पवार तिथे जाण्याआधी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे वर्षा येथे पोहचले होते. त्यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा अधिक तपशील मिळाला नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवर विसंवाद दिसून येत आहे. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेली विविध विरोधी पक्षांची बैठक, काँग्रेसकडून पुन्हा पुन्हा केला जात असलेला स्वबळाचा निर्धार, यातूनही संबंध ताणले गेले असून संवादाचा पूल भक्कम करण्यासाठी संजय राऊत यांच्या मध्यस्थीने पवार-ठाकरे भेट होत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.
वाचा: पुणे: ‘आंबिल ओढा झोपडपट्टीवरील कारवाईमागे भाजपचे हितसंबंध’