‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना असणं आवश्यक आहे. करोनाच्या काळात माझ्या फॅमिली डॉक्टरांनी मला उत्तम मार्गदर्शन तर केल. मागच्या वर्षी मला करोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा हा व्हायरस डॉक्टरांसाठीसुद्धा नवीन होता. मी नानावटी रुग्णालयात दोनदा दाखल झालो. माझी तिथे उत्तम काळजी घेतली गेली. शिवाय डॉ. आंबरडेकर, डॉ. कानिटकर, डॉ. अनुजा वैद्य यांनी माझ्या कुटुंबियांना धीर देण्याचं कामंही केलं. डॉक्टरांचं काम मोठंच आहे. ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत.
आपुलकीने घेतली काळजी
मला करोनाचा संसर्ग झाला तेव्हा मी ठरवून ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल झालो. आपण नर्सेसना ‘सिस्टर’ ही उपमा अगदी बरोबर दिली आहे. बहिणीप्रमाणे नर्सेस काळजी घेत असतात. त्यातील अनेक जणींना करोनाचा संसर्ग झाला होता. ते घरी न जाता तिथेच उपचार घेऊन, बरं होऊन कामावर रुजू झाले होते. मर्यादित उपचारपद्धती, कर्मचारी अशा अनेक समस्या असताना त्यांनी धैर्याने केलेल्या कामाला मानाचा मुजरा.
– अभिजीत केळकर, अभिनेता
माझ्यासाठी देवच
सध्याच्या काळात आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता डॉक्टर्स जे सांगतील ते ऐकायला हवं. प्रत्येक रूग्णाला वाचवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी जीवाचं रान करत आहेत. समाज म्हणून आपण त्यांना साथ द्यायला हवी. त्यांचा आदर करायला हवा. माझ्यासाठी देव आणि डॉक्टर सारखेच आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अफाट कार्यामुळेच अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांची साथ देऊ या. त्यांचा मान राखू या.
– प्रियदर्शन जाधव, अभिनेता
श्रेय त्यांनाच
करोनाच्या काळात माणसातला देव डॉक्टरांच्या रूपानं याचि देही याचि डोळा पाहता आलं. मला करोनाचा संसर्ग झाला होता तेव्हा मी सगळं या मानवरूपी देवांच्या हातात दिलं होतं. आज मी पुन्हा आधीच्या जोमानं काम करतेय. पूर्वीच्या ऊर्जेनं काम करण्यात डॉक्टरांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. करोनासारख्या संकटातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी खूप मदत केली. नुकताच माझा वाढदिवस झाला. त्या दिवसाचा मी मनमुराद आनंद घेऊ शकले याचं पूर्ण श्रेय माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना जातं.
– मृणाल कृलकर्णी, अभिनेत्री
शब्दांच्या पलीकडचं
मला करोनाचा संसर्ग झाला त्यावेळी रुग्णालयात खाटा, रेमडेसिवीर या आवश्यक बाबी उपलब्ध करुन देण्यासाठी डॉक्टरांनं मोलाचं सहकार्य लाभलं. मी रुग्णालयात असताना वैदकीय कर्माचऱ्यांचं आयुष्य जवळून बघता आलं. ते करत असलेलं काम शब्दांच्या पलीकडचं आहे. मला होणारा त्रास अर्ध्या तासात कमी करणं, ‘स्वाभिमान’ या मालिकेच्या चित्रीकरणाला जाण्यासाठी लागणारा आत्मविश्वास देणं हे सगळं डॉक्टरांनी केलं. पुन्हा कामाला सुरुवात करण्याबाबत त्यांनी दिलेला सल्ला मोलाचा ठरला. त्यामुळे साक्षात देव पाहिल्याचा अनुभव मिळाला.
– अशोक शिंदे, अभिनेते
कुटुंब सदस्यच जणू
अनेक तास काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि डॉक्टरच वेळोवेळी ती ऊर्जा देतात. करोनाच्या काळातही त्यांनी अगदी घरच्यांसारखी काळजी घेतली. करोनावर मात करण्यासाठी पूर्णतः डॉक्टरांच्या सल्ल्याची आणि त्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती. मला करोनाचा संसर्ग झाला त्यावेळी त्यांनी हीच गरज अगदी कुटुंबाचा सदस्य असल्याप्रमाणे पूर्ण केली. आपण फार कठीण काळातून जातोय. पण हा काळ मागे सारण्याचं बळ कोणात असेल तर ते डॉक्टर आहेत. त्यांच्या कार्याला, मेहनतीला सलाम.
– जगन्नाथ निंवगुणे, अभिनेते
संकलन: संपदा जोशी, रामेश्वर जगदाळे