हायलाइट्स:
- मुंबै बँकेवरील सर्व आरोप प्रवीण दरेकर यांनी फेटाळले.
- १२३ कोटींचा घोटाळा, हा आकडा कुठून आणला?
- मी कोणत्याही दबावाला भीक घालत नाही: दरेकर
वाचा:‘शरद पवारांच्या बदनामीची सुपारी फडणवीसांनीच पडळकरांना दिलीय’
प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबै बँकेवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. ‘प्रत्येक बाबतीत आवाज उठवणारा दरेकर आता कुठे गायब झाला आहे, असे विचारले जात आहे, पण मी कुठेही गेलेलो नाही’, असे नमूद करताना मुंबै बँकेवर जे आरोप केले जात आहेत त्यामागे केवळ आणि केवळ राजकारण आहे. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे हे माझे राजकीय विरोधक आहेत आणि सुर्वे हे राजकीय सूडापोटी चौकशी करून काही हाती लागतंय का हे बघत आहेत. प्रकाश सोळंकी यांच्याकडून जाणीवपूर्वक आमची चौकशी लावून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. पण यातून काहीच साध्य झालं नाही, असे दरेकर यांनी सांगितले.
वाचा: कोणालातरी अजित पवारांचा काटा काढायचाय; राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप
मुंबै बॅंक ही अ वर्ग असणारी बँक आहे. विधिमंडळाच्या सभागृहात बँकेचे कौतुक झालेले आहे. नाबार्डने देखील आमचे कौतुक केले आहे. पण सध्या ज्या काही चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत त्याने बँकेची बदनामी होत आहे. याबाबत अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे, असेही दरेकर यांनी नमूद केले. बँकेविरोधात ज्या याचिका दाखल केल्या होत्या त्या कोर्टाने फेटाळल्या आहेत. जे जे आरोप आमच्यावर झाले त्या प्रत्येकाला आम्ही उत्तर दिले आहे, असे सांगत तांत्रिक बाबीही दरेकर यांनी समोर ठेवल्या. मला जितकं अडचणीत आणण्याचा प्रयत्न कराल तितका मी आक्रमकपणे प्रश्न मांडत राहीन. दबावाला घाबरणारा मी नाही. तुम्ही कोणतीही चौकशी करा, मी त्यास सामोरा जायला तयार आहे, असे स्पष्ट करताना बँकेवरचा विश्वास ग्राहकांनी कायम ठेवावा. जनतेच्या आणि सहकाराच्या सेवेसाठी मुंबै बँक सदैव तत्पर आहे, असेल आणि राहील, असे आवाहन दरेकर यांनी केले.
वाचा: मंत्रीच घोषणा देऊ लागले, हे पाहून आंदोलक गडबडले आणि…