Home ताज्या बातम्या गणेशमूर्तींच्या उंचीबाबत आज होणार चर्चा; गणेशोत्सव मंडळांची भूमिका ठाम

गणेशमूर्तींच्या उंचीबाबत आज होणार चर्चा; गणेशोत्सव मंडळांची भूमिका ठाम

0
गणेशमूर्तींच्या उंचीबाबत आज होणार चर्चा; गणेशोत्सव मंडळांची भूमिका ठाम

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीच्या मुद्यावर राज्य सरकारमधील प्रमुख प्रतिनिधी आणि बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समिती, मूर्तिकार, प्रमुख मंडळांचे प्रतिनिधी यांच्यात आज, बुधवारी होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीकडे सगळ्याच गणेशोत्सव मंडळांचे लक्ष लागले आहे. प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तीच्या उंचीबाबत कोणतीही तडजोड न करण्याची ठाम भूमिका घेतल्याने हाच मुद्दा या बैठकीत गाजणार आहे.

राज्य सरकारने गणेशोत्सवाबाबत जाहीर केलेल्या नियमावलीवर मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती; त्यामुळे नियमावलीतील विविध मुद्यांवर समन्वयातून तोडगा काढण्यासाठी आज, बुधवारी शिवसेना भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य सरकारमधील मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, अनिल देसाई, लिलाधर डाके, विनोद घोसाळकर यांच्यासह बृहन्मुंबई समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर, पदाधिकारी कुंदन आगासकर, गिरीश वालावलकर, पांडुरंग सकपाळ आणि काही प्रमुख मंडळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहाणार आहेत. इतर काही मंडळांचे प्रतिनिधी झूमद्वारे या बैठकीत सहभागी होतील.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वातावरणात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा व्हावा, यावर चर्चा हा बैठकीचा प्रमुख उद्देश असला तरी गणेशमूर्तीच्या उंचीवरील बंधने, विसर्जन नियोजन याच मुद्यांवर बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. मूर्तीच्या उंचीवर कोणतीही बंधने असू नयेत, ही प्रमुख मागणी मंडळांतर्फे करण्यात येणार आहे. तर जाहीर झालेल्या नियमावलीनुसार यंदाचा उत्सव साजरा करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारच्या प्रतिनिधींचा भर असणार आहे. त्यामुळे बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंसोबत बैठक

राज्य सरकारचे गणेशोत्सवाबाबतचे नियम मंडळांना मान्य नसून त्यात बदल करण्यात यावा यासाठी अखिल सार्वजनिक उत्सव समिती (महाराष्ट्र) च्या प्रतिनिधींनी मूर्तिकार आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. उत्सव हा उत्सवासारखाच साजरा झाला पाहिजे. मी याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो. चर्चेतून या विषयातून मार्ग निघेल, असे यावेळी राज ठाकरे यांनी सांगितल्याचे अखिल सार्वजनिक उत्सव समितीने म्हटले आहे.

Source link