हायलाइट्स:
- अभिनेत्री शगुफ्ता अली यांची आर्थिक परिस्थिती बिकट
- डान्स दिवाने ३ च्या संपूर्ण टीमकडून शगुफ्ता अली यांना आर्थिक मदत
- आर्थिक मदत केल्याबद्दल सगळ्यांचे मानले आभार
‘डान्स दिवाने ३’च्या आगामी भागामध्ये अनिल कपूर, फरहान अख्तर, मृणाल ठाकूर आणि रोहित शेट्टी सहभागी होणार आहे. या आगामी भागामध्ये सर्वजण मिळून खूप धम्माल केली आहे. आगामी भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यावरून या सर्वांनी खूप मज्जा केल्याचे दिसत आहे. ही मज्जा करत असतानाच एका भावूक क्षणाचे साक्षीदारही सगळेजण झालेत. या कार्यक्रमाच्या सेटवर अभिनेत्री शगुफ्ता अली देखील खास पाहुण्या म्हणून सहभागी होणार असल्याचे या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शगुफ्ता अली यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी देखील त्यांना आर्थिक मदत दिली आहे.
शगुफ्ता यांनी सांगितली आपबिती
कार्यक्रमाचा सूत्रसंचालक हर्ष लिंबाचियाने म्हणाला, काही दिवसांपूर्वी शगुफ्ता यांच्या संदर्भातील एक बातमी आपण सर्वांनीच वाचली आहे. ती वाचून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. नेमके काय झाले आहे, असा प्रश्न हर्षने शगुफ्ता यांना विचारला. त्यावर शगुफ्ता यांना खूपच गहिवरून आले, त्या म्हणाल्या, ‘ गेल्या ३६ वर्षांपैकी ३२ वर्षे खूप छान गेली. या काळात मी खूप संघर्ष केला, खूप काम करत माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवला. परंतु गेल्या चार वर्षांपासून मी कामासाठी खूप ऑडिशन दिल्या परंतु काम मात्र मिळाले नाही. त्यातच मला डायबेटिस असल्याचे समोर आले. या डायबेटिसमुळे माझ्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. डायबेटिस खूप जास्त असल्याने त्याचा परिणाम माझ्या पायांवर, डोळ्यांवर झाला. गेल्या चार वर्षांपासून मी हे सगळे सहन करत आहे. परंतु आता हे सगळे सहनशक्तीच्या पलिकडे गेले आहे. ही इंडस्ट्री म्हणजे माझे दुसरे घर आहे. येथे मी आयुष्यातील ३६ वर्षे काढली आहेत…’
माधुरीने दिला धीर
हे सर्व सांगत असताना शगुफ्ता यांना आपले अश्रू रोखता आले नाही. तेव्हा भारती सिंह स्टेजवर आली आणि तिने त्यांना मिठी मारली. त्याचवेळी माधुरी दीक्षित देखील स्टेजवर आली. माधुरीने स्टेजवर येऊन सांगितले, ‘ तुम्ही सांगितले आता तुमच्याकडे विकण्यासाठी काहीच उरले नाही… तुमची ही परिस्थिती पाहून डान्स दिवाने कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमला तुम्हाला मदत करण्याची इच्छा आहे. त्यामुळेच आमच्या सर्वांकडून पाच लाख रुपयांचा चेक तुम्हाला देत आहोत. प्लिज तो घ्या…’ माधुरीकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे शगुफ्ता खूपच भावूक झाल्या आणि त्यांनी संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले.
रोहित शेट्टीने केली मदत
शगुफ्ता अली यांच्या स्थितीबद्दल जेव्हा रोहित शेट्टीला समजले तेव्हा, त्याने देखील आर्थिक मदत केली. शगुफ्ता यांच्या स्थितीबद्दल रोहितला अशोक पंडित यांच्याकडून समजले होते. रोहितकडून मदत मिळाल्यावर शगुफ्ता यांनी सांगितले, मी आतापर्यंत रोहित यांना कधीच भेटले नाही.परंतु आमची कोणतीही ओळख नसताना त्यांनी जी मदत केली त्याबद्दल आभार मानावे तितके कमी आहे. रोहित हे अतिशय सहृदय व्यक्ती आहेत. त्यांच्यावर देवाचा कृपा कायम राहिल…’ दरम्यान, शगुफ्ता यांना आतापर्यंत सुमित राघवन, सुशांत सिंह आणि नीना गुप्ता यांनीही आर्थिक मदत केली आहे.