हायलाइट्स:
- बाळासाहेब ठाकरेंना मी आजही माझे गुरू मानतो.
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली कृतज्ञता.
- उद्धव ठाकरेंशी जमले नाही म्हणून शिवसेना सोडली.
वाचा:‘मला पुढील २५ वर्ष राजकारण करायचं आहे, म्हणून…’; नक्की काय म्हणाले फडणवीस?
नारायण राणे यांच्या दालनात गणपतीची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तसबीरी आहेत. त्याकडे बोट दाखवत यात बाळासाहेब ठाकरे कुठे दिसत नाहीत?, असे विचारले असता राणे यांनी बाळासाहेब आपल्या हृदयात आहेत, असेच सांगण्याचा प्रयत्न केला. ‘येथे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसत नाही त्याचे कारण मी आज एका वेगळ्या विचारसरणीच्या पक्षात काम करत आहे. मात्र, बाळासाहेबांना आजही मी माझे गुरू मानतो. मला त्यांनीच घडवलं आहे. ते मी कधीच नाकारलेले नाही. मी आज जो काही आहे तो त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आहे. आजही बाळासाहेबांवर माझं तितकंच प्रेम आहे’, अशा शब्दांत राणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बाळासाहेब ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते आणि आज हिंदुत्ववादी विचारसणीच्या पक्षातच मी काम करत आहे याचा मला आनंद आहे, असेही राणे यांनी पुढे नमूद केले.
वाचा: माझे समर्थक नाराज असू शकतात; पण…; पंकजा मुंडे अखेर बोलल्या
शिवसेना, काँग्रेस, स्वत:चा पक्ष आणि आता भाजप असा राणे यांचा राजकीय प्रवास झाला आहे. त्याबाबत विचारले असता, मी कोणत्याही लालसेने पक्ष बदलले नाहीत. प्रत्येकवेळी काही ना काही कारण होते. शिवसेनेत ३९ वर्षे काम केल्यानंतर मी शिवसेना सोडली. बाळासाहेबांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते मात्र उद्धव ठाकरे (नारायण राणे यांनी उद्धवजी असा उल्लेख केला) यांच्याशी माझं जमू शकलं नाही. त्यांच्याशी मतभेद झाल्याने मला शिवसेना सोडावी लागली. काँग्रेसचं म्हणाल तर काँग्रेसचे नेते मला दिल्लीत ताज हॉटेलमध्ये भेटले आणि पक्षात बोलावलं. अहमद पटेल यांनी मला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते पण १२ वर्षे झाली तरी तसं काही झालं नाही. ही नुसती टोलवाटोलवी चाललीय हे माझ्या लक्षात आलं आणि राहुल गांधी यांना सांगून मी काँग्रेस पक्ष सोडला. कोणतीही फसवाफसवी करून काँग्रेसमधून बाहेर पडलो नाही. त्यानंतर मी स्वतंत्र पक्ष काढला असता देवेंद्र फडणवीस यांनीच ‘दादा तुम्ही भाजपात या’, असं सांगितलं. मी युती सरकारमध्ये आणि नंतरही भाजपसोबत काम केलेलं असल्याने त्या पक्षात माझे चांगले संबंध होते. त्यामुळे भाजपात मला मान सन्मान दिला जाईल, या विश्वासाने आलो. कोणत्याही पदासाठी मी भाजपात आलेलो नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.
वाचा: कसलं पुनर्वसन? माझं घर वाहून गेलेलं नाही: पंकजा मुंडे
शिवसेनेला टक्कर देण्यासाठी राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. माझा इतक्या वर्षांचा अनुभव पाहून पंतप्रधान मोदी यांनी मला ही संधी दिली आहे, असेही राणे यावेळी म्हणाले. शिवसेनेचे फक्त ५४ आमदार आहेत. उद्धव ठाकरे दगाफटका करून मुख्यमंत्री झाले आहेत. असा पक्ष इतक्या मोठ्या भाजपला काय टक्कर देणार, असा सवालही राणे यांनी केला. शिवसेनेतून निघाल्यावर इतकी वर्षे मी त्यांना टक्कर देतच पुढे चाललो आहे. ते माझ्याशी स्पर्धा करू शकत नाहीत, असेही राणे म्हणाले. राणे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वाचा:केंद्र सरकार ट्वीटरसोबत का भांडतंय?; राष्ट्रवादीने सांगितलं कारण