मुंबई : विमानतळावरील पार्सलचा हव्यास हवाईसुंदरीला पडला महागात

मुंबई : विमानतळावरील पार्सलचा हव्यास हवाईसुंदरीला पडला महागात
- Advertisement -

म. टा. खास प्रतिनिधी

मुंबई : दुसऱ्याच्या पार्सलचा हव्यास एका हवाईसुंदरीला महागात पडला. या हवाईसुंदरीला ‘विमानतळावर परदेशातून तुमच्या नावाने पार्सल आले आहे’ असा फोन आला. परदेशात कुणी ओळखीचे नसतानाही त्याच्या मोहापायी या हवाईसुंदरीने हे आपलेच पार्सल असल्याचे सांगितले. विमानतळावरील अधिकाऱ्याने पार्सलमध्ये महागड्या वस्तू असल्याचे भासवून तिच्याकडून सव्वा लाख रुपये उकळले.

आग्रीपाडा येथे वास्तव्यास असलेल्या आणि एका खासगी विमान कंपनीत हवाईसुंदरी असलेल्या आकांक्षाला (बदललेले नाव) मोबाइलवर कॉल आला. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोलत असल्याचे भासवून एका महिला अधिकाऱ्याने यूकेमधून आलेल्या एका पार्सलची माहिती आकांक्षाला दिली. स्कॅन केले असता या पार्सलमध्ये बॅग, कपडे, घड्याळ, मोबाइल फोन आणि इतरही काही महागड्या वस्तू असल्याचे महिला अधिकारी म्हणाली. हे पार्सल स्वीकारण्यासाठी २५ हजार रुपये बँक खात्यावर पाठवावे लागतील, असेही तिने आकांक्षाला सांगितले. महागड्या वस्तू मिळत असल्याने आकांक्षाने महिला अधिकाऱ्याने दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठविले.

पुन्हा त्याच महिला अधिकाऱ्याचा फोन आला. आयात कर, दंड, डिलिव्हरी चार्जेस अशी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने आकांक्षाला आणखी एक लाख रुपये पाठविण्यास सांगितले. चार दिवसांनी पुन्हा एका फोनद्वारे पैशांची मागणी झाली. त्यावरून आकांशाला संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आकांक्षाने आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Source link

- Advertisement -