हायलाइट्स:
- शरद पवारांनी नाना पटोलेंना अनुल्लेखानं मारलं!
- पवारांच्या वक्तव्यानंतर नीलेश राणे यांचं ट्वीट
- नाना पटोले यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका
पटोले यांनी काल लोणावळा इथं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना मित्रपक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती. ‘पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. त्यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं केली जात नाहीत, असं पटोले म्हणाले होते. शरद पवार यांना पटोलेंच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी आज विचारणा केली, त्यावर ‘मी अशा गोष्टींमध्ये पडत नाही. नाना पटोले वगैरे लहान माणसं आहेत. मी त्यांच्यावर कशाला बोलू? सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी बोललो असतो,’ असं पवार म्हणाले.
वाचा: ‘पुण्यात राहायला आलो तर मी राज ठाकरेचा राज मोरे होईन का?’
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाबद्दल पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. नीलेश राणे यांनी ही संधी साधत एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘अरे रे रे… पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची पात्रता खूप चांगली ओळखता. नाना पटोले आत्ता कुठे स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत बघू लागले होते की तुम्ही त्यांचा थेट पानटपरीवालाचं करून टाकला.’
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आल्यापासून नाना पटोले हे सातत्यानं आक्रमक भूमिका घेत आहेत. राज्यभरातील कार्यकर्त्यांसमोर बोलताना स्वबळाचा पुनरुच्चार करत आहेत. स्वबळाच्या त्यांच्या भाषेबद्दल महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाला आक्षेप नव्हता. मात्र, काल त्यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. पवारांच्या आजच्या वक्तव्यातून ती उघड झाल्याचं बोललं जात आहे. आता काँग्रेस पवारांना उत्तर देणार की वाद टाळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचा: केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयावर शरद पवार म्हणाले, यात नवीन काय?