Home ताज्या बातम्या bhimrao panchale paid homage to poet naniwadekar’गज़लेचा स्थायीभाव आज लोप पावला’; गज़लनवाज़ भीमराव पांचाळेंनी नानिवडेकरांना वाहिली श्रद्धांजली

bhimrao panchale paid homage to poet naniwadekar’गज़लेचा स्थायीभाव आज लोप पावला’; गज़लनवाज़ भीमराव पांचाळेंनी नानिवडेकरांना वाहिली श्रद्धांजली

0
bhimrao panchale paid homage to poet naniwadekar’गज़लेचा स्थायीभाव आज लोप पावला’; गज़लनवाज़ भीमराव पांचाळेंनी नानिवडेकरांना वाहिली श्रद्धांजली

हायलाइट्स:

  • सुप्रसिद्ध गज़लकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन
  • गज़लनवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी वाहिली श्रद्धांजली
  • गज़लेचा स्थायीभाव लोपला- गजलनवाज भीमराव पांचाळे

मुंबई: सुप्रसिद्ध गझलकार, कवी, साहित्यिक आणि पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांचे आज वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबाबत गज़लनवाज़ पंडित भीमराव पांचाळे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘नानिवडेकर यांचे जाण्याचे वय नव्हेत, त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला’ असे सांगतानाच नानिवडेकर हे वाशी येथे संपन्न झालेल्या ९व्या अखिल भारतीय गजल संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नानिवडेकर हा प्रेमाचा शायर होता, प्रेम ही परिभाषा असलेल्या गज़लेचा स्थायीभाव आज लोप पावला, अशा शब्दात गज़लवाज़ पांचाळे यांनी गझलकार नानिवडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गज़लकार मधुसूदन नानिवडे यांचा आणि माझा ३० ते ३५ वर्षांपासूनचा परिचय होता. कुडाळमधील एका मैफलीत त्यांची आणि माझी पहिली भेट झाली. नानिवडेकर हे चांगले गज़लकार तर होतेच, पण हा सज्जन माणूस होता. सर्वांशी प्रेमाने वागणारा, नवोदितांना मार्गदर्शन करणारा, समजून घेणारा. अजिबात गर्वाचा लवलेश नसलेला. मृदूभाषी, साधा असा हा माणूस होता, अशा शब्दात गज़लनवाज़ पांचाळे यांनी कवी नानिवडेकर यांच्या स्वभावाचे अचूक वर्णन केले आहे.

नानिवडेकरांविषयी बोलताना पांचाळे म्हणतात, ‘गज़लची परिभाषा, म्हणजे गज़लचा स्थायीभाव प्रेम आहे. ‘सुखन अज माशुक गुफ्तन’ हा गज़लेचा स्थायीभाव आहे. आज तो स्थायीभाव लोप पावला आहे. मध्यंतरीच्या काळात गज़लेत सामाजिक आशय खूप प्रबळ झाला. याचे कारण म्हणजे समाजाचे प्रश्न वाढले , विवंचना वाढल्या. सहाजिकच कविता किंवा साहित्य हे समाजाभिमुखच असलं पाहिजे आणि ते असतं. तसं ते झालंही. सुरेश भट देखील समाजाभिमुखच झाले. गज़लेतला स्थायीभाव आटत चालला की काय असं वाटत असताना स्थायीभाव जपणारी जी काही आशेची किरणं होती, त्या थोड्याफार गजलकारांमध्ये नानिवडेकरांचा समावेश होतो. नानिवडेकर यांनी प्रेम हा स्थायीभाव कायम ठेवला आहे.’

क्लिक करा आणि वाचा- प्रसिद्ध गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचं निधन

‘नानिवडेकर हा प्रेमाचा शायर’

आपल्या आठवणींना उजाळा देताना गजलनवाज पांचाळे यांनी प्रेम हा स्थायीभाव जपणाऱ्या नानिवडेकरांच्या काही गज़लांचे शेर पेश केले. ते म्हणाले नानिवडेकर हा प्रेमाचा शायर होता. त्यांची ही गजल पाहा-

‘हा अबोला ठीक नाही
बोलबाई बोल काही’

‘पापण्यांनी बोलण्याची
कोणती आहे तऱ्हा ही’

‘घे गडे ओवाळुनी तू
प्राण हा माझा कसाही’

मात्र, प्रेमाचा स्थायीभाव जपत जपत नानिवडेकर यांनी सामाजिक भानही जपण्याचे काम केले. हा अबोला ठीक नाही या गजलेत ते मध्येच एक सामाजिक आशयाचा शेर पेरतात, ते आपल्या गजलेत पुढे म्हणतात,

‘गाव तंटामुक्त झाला
कोण ही देणार ग्वाही?’

इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे ते समाजिक उसळीच मारतात,पाहा त्यांचा अंदाज… ते म्हणतात,

‘देश आनंदात आहे
खिन्न आहे लोकशाही’

हे शेर पेश करताना आज आपल्या देशाची ही अशीच अवस्था असल्याचे सांगत नानिवडेकर संवेदनशील शायर असल्याचे पांचाळे यांनी सूचित केले आहे.

नानिवडेकरांचे आणखी शेर पाहा…

‘ठेव तू मनातल्या मनात चांदणे
आणतेस का गडे उन्हात चांदणे?’

‘पाहिजे जगावयास मीठ भाकरी
हे बरेच दूर चार हात चांदणे!’

‘सांग माळणार मी कशी तुला फुले
झोपले असेल ना फुलांत चांदणे’

नानिवडेकर आणि गज़लनवाज़ पांचाळे

‘मित्राचा मृत्यू हा आपलाच मृत्यू असतो’

कालचा दिवस सोडला तर दररोज त्यांच्याशी बोलणे व्हायचे. केवळ माझ्याशीच नाही तर सर्व मित्रांशी त्यांचा संपर्क होता. संपर्क केल्याशिवाय त्यांना करमायचेच नाही. असा प्रेमळ. हा मित्रही होता आणि आवडता शायरही होता. असे म्हणतात की मित्राचा मृत्यू हा आपलाच मृत्यू असतो, अशीच काहीशी माझी अवस्था असल्याचे पांचाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- तर दिल्लीसारखे मुंबईतही आंदोलन, शेतकऱ्यांचा राज्याला इशारा

नानिवडेकर आणि गज़लनवाज़ एका निवांत क्षणी

नानिवडेकरांची हमखास फरमाईश येणारी लोकप्रिय गजल:-

हरकत नाही….

चांदण्यात ह्या आलीस इथवर हरकत नाही
चंद्र गवसला पुनवेनंतर हरकत नाही

बोललीस तू नुसते वरवर हरकत नाही
म्हणालीस तू भेटू नंतर हरकत नाही

हरकत नाही माझी आता कसली बाकी
डबकी म्हणतील आम्हीच सागर हरकत नाही

तुझ्या घराच्या कोपऱ्यास मी अडगळ झालो
शोधायाला पुन्हा नवे घर हरकत नाही

रडता रडता मी अश्रुंचा फाया केला
तुला अता हे म्हणेल अत्तर हरकत नाही

तुझे नि माझे नाते कुठले सांग एकदा
तुझ्याकडे जर नसेल उत्तर हरकत नाही

मनात सगळे हवे हवेसे ओठी हरकत
अशी असू दे हरकत सुंदर हरकत नाही

भरतीहुनही तुझी ओहोटी भरात येते
जगावेगळा तुझा समिंदर.. हरकत नाही

घड्याळात पाहिले तिने अन् समजून गेलो
निघावयाला नानिवडेकर हरकत नाही

क्लिक करा आणि वाचा- आमदार रवी राणा यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर केली अक्षेपार्ह टीका

एका कार्यक्रमात गज़लनवाज़ पांचाळे आणि नानिवडेकर

Source link