वाचाः लोकलमुभा टप्प्याटप्प्याने; लसीकरण झालेल्यांना परवानगी मिळणार?
‘पिठापासून मिठापर्यंत, चहा-साखरेपासून भाजीपाल्यापर्यंत, अन्न-धान्यापासून खाद्यतेलांपर्यंत, बियाणांपासून खतांपर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सगळ्याचेच भाव भडकले आहेत. कधी काळी याच महागाईच्या प्रश्नावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत नरडी बसेपर्यंत घोषणाबाजी करणाऱ्या, कॅमेऱ्यासमोर येऊन महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘सत्तेवर येण्यासाठी निवडणूक प्रचारात वापरलेली ‘बहोत हो गई महंगाई की मार..’ या घोषवाक्याची टॅगलाईन आता कुठेच नजरेस पडत नाही. याच घोषणेवर विश्वास ठेवून महागाईविरोधात लढणारा पक्ष म्हणून देशवासीयांनी भाजपला दिल्लीच्या तख्तावर बसवले. आता महागाईचे संकट कायमचे दूर होणार, खिशात पैसेच पैसे खुळखुळणार, अच्छे दिन येणार या भाबड्या समजुतीतून देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, गोरगरीब जनतेने भरभरून भाजपच्या पात्रात भरघोस मतदान टाकले. केंद्रात लागोपाठ दोन वेळा भाजपचे सरकार बहुमताने निवडून दिले. मात्र, सत्तेवर येऊन सात वर्षे झाली, तरी केंद्रीय सरकारला महागाईचा राक्षस अजूनही मारता आलेला नाही. उलट महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढतोच आहे. महागाईवर तर मार पडली नाही आणि गोरगरीबांच्या खिशावरचा मार मात्र वाढला,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
वाचाः बदल्यांची टक्कावाढ; घटक पक्षांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता
‘देशभरात महागाईचा आगडोंब उसळला असताना मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये महागाई थोडीशी कमी झाली, असा दावा सरकारच्या ताज्या आकडेवारीत करण्यात आला आहे. त्यावर विश्वास कोण ठेवणार? महागाईचा घोडा चौखूर उधळला आहे. त्यावर मांड ठोकून लगाम ओढण्याचा कोणताही उपाय सरकार करताना दिसत नाही. छोटा उतारा म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढविण्याचा ताजा निर्णय सरकारने घेतला. काही लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असला, तरी महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या कोट्यवधी गोरगरीब जनतेने कसे जगायचे, याचे उत्तर सरकारकडे आहे काय?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
वाचाः रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मुंबईतील ‘या’ पाच प्रभागांमध्ये चिंता वाढली