हायलाइट्स:
- करिना कपूरचं पुस्तक ‘प्रेग्नन्सी बायबल’ काही दिवसांपूर्वीच झालं आहे प्रकाशित
- आपल्या पुस्तकामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे करिना कपूर
- करिनाच्या विरोधात पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तक्रार
अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रेसिडंट असलेले आशिष शिंदे यांनी या पुस्तकाच्या नावावरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीत सांगण्यात आलं आहे की, ‘प्रेग्नन्सी बायबल’ची लेखिका करिना कपूर आणि अदिती शाह भीमजानी आहे आणि हे पुस्तक जगरनॉट बुक्सने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
शिंदे यांच्या मते, ‘पवित्र शब्द ‘बायबल’ हा पुस्तकाच्या नावात वापरण्यात आला आहे. ज्यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.’ त्यांनी करिना आणि अन्य दोघांच्या विरोधात आयपीसी कलम २९५- अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यानं याबाबतची तक्रार आल्याचं मान्य केलं आहे पण यासोबतच कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही हे देखील स्पष्ट केलं आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे इंचार्ज इन्पेक्टर साईनाथ ठोंबरे यांनी न्यूज एजन्सी पीटीआयशी बोलताना म्हणाले, ‘आमच्याकडे याबाबत तक्रार आली आहे. मात्र एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. कारण ही घटना इथली नाहीये. मी त्यांना मुंबईमध्ये जाऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.’
दरम्यान करिनाचं पुस्तक ‘प्रेग्नन्सी बायबल’ ९ जुलै रोजी प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे आपलं तिसरं बाळ असल्याचं करिनानं म्हटलं आहे. तिनं सोशल मीडियावर पुस्तकाचं प्रमोशन करत असतानाच वेगवेगळ्या पोस्ट केल्या होत्या. करिनाच्या मते, या पुस्तकात तिच्या खासगी आयुष्याचा उल्लेख आहे. जसे की, दोन्ही प्रेग्नन्सीच्या वेळी तिनं शारिरीक आणि भावनिक स्तरावर कोणते अनुभव घेतले याचा उल्लेख करण्यात आला आहे.