हायलाइट्स:
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भुजबळ- फडणवीस भेट
- राजकीय वर्तुळात भेटीची चर्चा
- देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
छगन भुजबळ यांनी आज सकाळी फडणवीसांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार समीर भुजबळदेखील होते. त्यामुळं राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली होती. या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ओबीसी राजकीय आरक्षणासंबंधी छगन भुजबळ यांनी आज भेट घेऊन चर्चा केली. मी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात संपूर्ण मदत करेन,’ असं अश्वासन फडणवीस यांनी दिलं आहे.
वाचाः अण्णा हजारेंनी केली स्वत: स्थापन केलेल्या बँकेतील गैरव्यवहाराची तक्रार; हे कसं घडलं?
‘ओबीसींचा ‘इम्पिरिकल डेटा’ कसा गोळा करता येईल. यासंदर्भात आम्ही चर्चा केली. आमच्यासाठी हा राजकीय प्रश्न नाही. मी एक स्वतंत्र नोट तयार करत आहे. फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी हे सहज शक्य आहे, असं मी भुजबळांना सांगितलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच, हा प्रश्न राज्यातच सुटण्यासारखा आहे. शेवटी नेतृत्व सरकारलाच करायचं असतं. त्यामुळं भुजबळांनी पुढाकार घ्यावा,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः मोठी घडामोड! छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकांचा विषय सध्या चर्चेत आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे शिवसेन, राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपनंही आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ‘अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलण्याची बैठक ही नियमित अध्यक्षांच्या अध्यक्षतेत होऊ शकते. उपाध्यक्षांना तो अधिकार नाही. पण या सरकारकडे बहुमत आहे तर मग ही उठाठेव कशासाठी? सरकार घाबरते कशासाठी? यासंदर्भात जेव्हा विषय येईल तेव्हा आमची भूमिका सांगू,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.