Jayant Patil: PM मोदी-शरद पवार भेटीमागे दडलंय काय?; राष्ट्रवादीने केले स्पष्ट

Jayant Patil: PM मोदी-शरद पवार भेटीमागे दडलंय काय?; राष्ट्रवादीने केले स्पष्ट
- Advertisement -

हायलाइट्स:

  • शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीचे कारण झाले स्पष्ट.
  • सहकारी बँकांच्या मुद्द्यावर पवार मोदींना भेटले.
  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला दावा.

मुंबई: देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विविध कारणांनी चर्चेत असतानाच आज पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीचे अनेक अर्थ काढले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भेटीमागचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे. ( Sharad Pawar PM Modi Meeting Update )

वाचा:नरेंद्र मोदी – शरद पवार यांच्या तासाभराच्या भेटीत ‘सहकारा’ची चर्चा?

शरद पवार हे यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. त्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे मोर्चेबांधणी करत आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे आव्हान उभे करायचे असेल तर विरोधकांची मोट बांधून त्याचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे द्यायला हवे. मोदींसमोर याघडीला शरद पवार हाच सक्षम पर्याय आहे, असे जाहीर विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते व त्यावरूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहचल्याने सर्वांचेच लक्ष या भेटीकडे लागले. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दिल्लीत रवाना होण्यापूर्वी शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यामुळे मोदी-पवार भेटीतून राज्यात नवी समीकरणे तयार होत आहेत का, असेही विचारले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या सर्व शक्यता फेटाळून लावण्यात आल्या आहेत.

वाचा: शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, फडणवीसही दिल्लीत
सहकारी बँकिंग क्षेत्राची सद्यस्थिती हे शरद पवारांच्या मोदीभेटीचे प्रमुख कारण असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. देशभरातील सहकारी बँकांची अनेक गाऱ्हाणी आली आहेत. त्याचा विचार करता यात केंद्र सरकारने लक्ष घालावे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या जाव्यात अशी विनंती करण्यासाठी शरद पवार हे पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले होते, असे पाटील यांनी नमूद केले. याशिवाय शरद पवार यांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. कालच सरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शरद पवार व ए. के. अँटनी यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यामुळे संरक्षणाच्या मुद्द्यावरही पवारांनी मोदींशी चर्चा केली असावी, असे पाटील यांनी सांगितले. आजच्या भेटीचा नेमका तपशील माझ्याकडे नसला तरी देशहिताच्या काही प्रमुख विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचे पवारांनी सांगितले होते, असेही पाटील यांनी पुढे स्पष्ट केले.

वाचा: शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला दणका; सरकारने दिली ‘ही’ परवानगी

Source link

- Advertisement -