– खऱ्या आयुष्यात सुप्रियाला शाहिरबद्दल जी आत्मियता वाटते, तीच मालिकेत ईश्वरीला देवबद्दल वाटते. अगदी पडद्यामागेही आमच्यात खूपच सुंदर नातं आहे आणि त्याचंच प्रतिबिंब पडद्यावरच्या आमच्या नात्यातही उमटतं. जशी ईश्वरी आपल्या मुलांवर खूप प्रेम करते तशीच मीदेखील माझ्या मुलीवर खूप प्रेम करते आणि तिची काळजी घेते. इतकंच नव्हे तर मी श्रियासाठी काहीही करू शकते. त्यामुळे मला वाटतं की ईश्वरी आणि माझ्यात बरंच साम्य आहे.
– दोन मालिका एका वेळी करणं हे खरं तर माझ्यासाठी न झेपणारं काम आहे. परंतु, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेच्या भागांची आधीच बँक तयार आहे. तसंच वाहिनीनं पुन्हा ती मालिका रिलाँच करायचं ठरवलं असल्यानं त्या मालिकेचं तितकंसं काम सध्या नाहीय.
० तुम्ही मराठी मालिका पाहता का? कोणती मालिका तुमची आवडती आहे?
– आमच्या घरी मराठी मालिकाच प्रामुख्यानं पहिल्या जातात. ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘आई कुठे काय करते?’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिका मी नियमित पाहते. निवेदिताची ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिकादेखील मी आवडीनं पाहायचे. पौराणिक कथा असणाऱ्या मालिकासुद्धा मी आवर्जून पाहते.
० मराठीत पुन्हा काम करायला आवडेल का?
– खरं तर माझाच विश्वास बसत नाही की मी मराठीत इतकी वर्षं काम केलं नाहीय. याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा माझ्याकडे मोकळा वेळ होता तेव्हा मला करायला आवडेल असं काम मिळालं नाही आणि जेव्हा मिळालं तेव्हा मी आधीपासूनच हिंदीमधील प्रोजेक्ट करत होते. मराठीतही मालिका आणि चित्रपट दोन्हीसाठी मला विचारलं होतं. परंतु मला वाटतं की आईचं पात्र असलं तरी ते नुसतंच एक पात्र नसावं, त्यात काहीतरी आव्हानात्मक करण्यासारखं असावं.
० मराठी आणि हिंदी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताना काय फरक जाणवतो?
– मराठीत सध्या सुरु असलेल्या ग्रामीण मालिकांमध्ये खूपच सुंदर अभिनय करणारे कलाकार दिसतात. हिंदीत काम करताना मी सेटवर नेहमीच याविषयी सांगत असते की, हिंदी मालिकांमधील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपेक्षा मराठी मालिकांमधील कलाकार खूपच सराईत आहेत. मराठी कलाकारांना हिंदीत प्रमुख भूमिका मिळायला हव्यात, असंही वाटतं.
० मराठीत तुम्ही केलेले चित्रपट आणि सध्या प्रदर्शित होत असलेले चित्रपट यात काय फरक जाणवतो?
– वेळेनुसार विषयांमध्ये झालेला बदल हा चांगला आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचा आहे. मी प्रामुख्यानं विनोदी चित्रपट केले होते. तो दर्जा मात्र मला सध्या दिसत नाहीय. निदान माझ्या पाहण्यात तरी निखळ विनोद असलेले चित्रपट आलेले नाहीत. परंतु अनेक चित्रपट असेही आहेत जे मला प्रचंड आवडले, त्यातील काही म्हणजे ‘कोर्ट’, ‘किल्ला’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘दुनियादारी’.