हायलाइट्स:
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा मदतीचा हात
- लोणकर कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज फेडलं!
- फडणवीसांच्या उपस्थितीत स्वप्नीलच्या वडिलांना दिला धनादेश
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते स्वप्नीलचे वडील सुनील तात्याबा लोणकर यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. लोणकर यांच्यावर शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेचं कर्ज होतं. मुलगा काही दिवसांतच नोकरीला लागेल व कर्ज फेडता येईल या आशेवर लोणकर कुटुंबानं हे कर्ज घेतलं होतं. दुर्दैवानं तसं झालं नाही. स्वप्नीलनं आत्महत्या केली. त्यातच घरातील प्रिटींग प्रेस बंद पडली. ह्या सगळ्याला तोंड देत असतानाच पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा सुरू झाला होता. त्यामुळं लोणकर कुटुंब त्रस्त होतं. लोणकर कुटुंबीयांची ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर भाजपनं तात्काळ त्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आज पक्षातर्फे पतसंस्थेचं कर्ज फेडण्यासाठी आवश्यक ती रक्कम लोणकर कुटुंबीयांना देण्यात आली. ‘लोणकर कुटुंबीयांच्या पाठीशी भाजप यापुढंही उभा राहील व भविष्यात स्वप्नीलसारखी वेळ कोणावरही येऊ नये असा आमचा प्रयत्न असेल,’ असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. स्वप्नीलच्या वडिलांनी यावेळी भाजपचे आभार मानले. आमदार गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
स्वप्नील लोणकरनं आत्महत्या का केली?
स्वप्नील लोणकर हा तरुण एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र परीक्षा पास झाल्यानंतर दीड वर्षे उलटल्यानंतरही त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यानंतर २०२० मध्ये सुद्धा त्यानं एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, करोनामुळे मुख्य परीक्षा झाली नाही. हे सगळं कधी होणार आणि नोकरी कधी मिळणार? या तणावातून २९ जून रोजी स्वप्नीलनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एमपीएससीच्या मायाजालात अडकू नका, असं आवाहनही त्यानं सुसाइड नोटमधून केलं होतं.
आणखी वाचा:
फडणवीसांची ती योजना ‘झोलयुक्त’च होती; काँग्रेसचा हल्लाबोल
आतापर्यंत खूप सहन केलं; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र