हायलाइट्स:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा
- हे अनपेक्षित संकट; सर्व यंत्रणांकडून बचावकार्य सुरू – मुख्यमंत्री
- जीव वाचवण्यास प्रशासनाचं पहिलं प्राधान्य – मुख्यमंत्री
वाचा: ‘आपापली मुलंबाळं, जनावरं घेऊन वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा’
राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ‘सध्याचं संकट अनपेक्षित असं आहे. गेल्या कित्येक वर्षात झाला नव्हता इतका पाऊस कमीत कमी वेळेत झाला आहे. दरडी कोसळताहेत. नद्या फुटताहेत. मात्र, या सगळ्या संकटाला आपण धैर्यानं सामोरं जात आहोत. लष्कर, नौदल, कोस्ट गार्ड, एनडीआरएफची पथके मदत व बचावकार्यात सहभागी झाली आहेत. लोकांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच फोनवरून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली व संपूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
वाचा: पुरात अडकलेल्यांनी घराच्या छतावर यावं; रायगड जिल्हा प्रशासनाचं आवाहन
‘काही ठिकाणी पाऊस थांबतोय, तर काही ठिकाणी पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळं मदतकार्यात अडथळे येत आहेत. धरणं भरली असल्यामुळं पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. ते पाणी कुठं जाईल हे लक्षात घेऊन नागरिकांना स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अन्न व पाण्याचा पुरवठाही लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिथं सर्वाधिक पाऊस झालाय, त्याच भागात करोनाचा संसर्गही मोठा आहे. त्यामुळं जीव वाचवण्याला सध्या आपलं प्राधान्य आहे. सर्व यंत्रणा मिळून या संकटाला तोंड देत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. रायगडमधील तळई गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं. डोंगर उतारांवरील गावे व वस्त्या येथील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य कराव. पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागानं दिलेला इशारा लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
वाचा: कोल्हापूरमधील पुरात बुडालेल्या गाड्यांतून ३६ जणांची सुटका
उद्धव ठाकरे