Home ताज्या बातम्या राज्य सरकारच्या लसनियमांची प्रतीक्षा

राज्य सरकारच्या लसनियमांची प्रतीक्षा

0
राज्य सरकारच्या लसनियमांची प्रतीक्षा

म. टा. विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींना घरी जाऊन लस देण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे. मात्र घरी असलेल्या अशा रुग्णांचे लसीकरण केल्यानंतर कुपीमधील उरलेल्या मात्रा वाया जाण्याची शक्यता आहे. या मात्रा वाया जाऊ नयेत यासाठी पालिका नियोजन करणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारची नियमावली जाहीर झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईमध्ये अनेक रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिक वेगवेगळ्या आजारांमुळे घरामध्ये अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे शक्य नाही. त्यामुळे या व्यक्तींचे लसीकरण करण्यात यावे असा आग्रह सातत्याने संबधित रुग्णांच्या कुटुंबीयांकडून केला जात होता. पालिकेने यासंदर्भात निर्णय घेत १ ऑगस्टपासून घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लस घेतल्यानंतर या व्यक्तीला अर्धा तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. लस घेण्यापूर्वी त्या रुग्णाची वैद्यकीय माहिती, आजाराचे स्वरूप तसेच इतर सहआजारांची माहितीही द्यावी लागणार आहे. लसीच्या मात्रा वाया न घालवण्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्यांना निर्देश दिले आहेत.

लसतुटवड्यामुळे या निर्देशांचे पालन काटेकोरपणे केले जाते. एका कुपीमध्ये असलेल्या दहापैकी दहा मात्रा वापरल्या जाव्यात यासाठी दिलेल्या वेळेमध्ये लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे निर्देश लसीकरण केंद्राकडून दिले जातात. घरी जाऊन लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तीचेच लसीकरण व्हायला हवे, इतर कुणीही त्यासाठी आग्रह धरता कामा नये हा विचारही पालिका नियोजनामध्ये करणार आहे.

वृद्धाश्रमांचाही विचार व्हावा

वृद्धाश्रमांमध्ये अनेक वर्षांपासून विकलांग, आजारी तसेच कृशावस्थेमध्ये असलेले ज्येष्ठ नागरिक राहतात. अनेकांकडे कागदपत्रेही नाहीत. काही जणांचा कुटुंबाशी संपर्कही राहिलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी काही संस्थांनी पुढाकार घेऊन काही वयोवृद्धांचे लसीकरण केले तरीही अनेकांचे लसीकरण अद्याप झालेले नाही, असे ज्येष्ठ व्यक्तींच्या समस्यांसाठी काम करणाऱ्या शैलेश मिश्रा यांनी सांगितले.

घरी लसीकरणाबाबत राज्य सरकारने अद्याप नियमावली जाहीर केलेली नाही. ती दोन दिवसांत येणे अपेक्षित आहे. वॉर्डनिहाय अशा किती व्यक्तींना लसीकरण करायचे आहे यादृष्टीने विचार केला जाईल. संबधित रुग्णाच्या फॅमिली डॉक्टरने त्या व्यक्तीला लसीकरण करणे योग्य आहे का, असे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासंदर्भातही विचार सुरू आहे. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

Source link