
मुंबई: नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत परखडणे मांडणारे अभिनेता
मुकेश खन्ना यांनी आता
राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या भूमिकेवर आपलं मत मांडलं आहे. राज कुंद्राच्या या सर्व गोष्टींबाबत पत्नी शिल्पा शेट्टीला सर्व माहिती असेल आणि तिला माहीत असेल तर तिनं पुढाकार घेऊन यावर बोलण्याची हिंमत दाखवायला हवी असं त्यांनी म्हटलं आहे.
राज कुंद्राला पॉर्न फिल्म तयार करणं आणि वेगवेगळ्या अॅप्स आणि वेबसाइटवर ते व्हिडिओ प्रसारित करण्याच्या आरोपांखाली क्राइम ब्रांचनं अटक केली आहे. २३ जुलैला झालेल्या सुनावणीत राज कुंद्राची पोलीस कोठडी २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज कुंद्राची दिर्घकाळ चौकशी केल्यानंतर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी केली आहे. या सर्व गोष्टीवर बोलताना, याला कोण जबाबदार आहे किंवा कोण नाही हे माहीत नाही पण शिल्पा शेट्टीला १२० टक्के या सर्व गोष्टींची कल्पना असेल असं अभिनेता मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे.
नुकतंच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाले, ‘जनता ही जनता असते. मीडिया जेवढं दाखवणार तेवढंच त्यांना माहीत असतं. एकेकाळी रेडिओवर बातम्या ऐकू येत असत. आता हेच काम वृत्तवाहिन्या करतात. पण या प्रकरणाबाबत मला आनंद या गोष्टीचा आहे की, अखेर हा मुद्दा हे प्रकरण समोर आलं.’
मुकेश खन्ना पुढे म्हणाले, ‘आता बॉलिवूडकर हॉलिवूडचं अनुकरण करताना दिसत आहेत. त्याचेच हे सर्व परिणाम आहेत. ते दोघं पती-पत्नी आहेत आणि मला त्यांच्यात बोलण्याचा काहीच अधिकार नाही. त्यांचं नातं कसं आहे मला माहीत नाही. मी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की आपली इंडस्ट्री हॉलिवूडचं अनुकरण करते. त्यांच्याकडे लग्न कमी आणि घटस्फोट जास्त होताना दिसतात. जे आता बॉलिवूडमध्येही दिसू लागलंय. अशात राज कुंद्रा जे काही काम करत होता त्याबद्दल शिल्पा शेट्टीला १२० टक्के कल्पना होती. ती याला जबाबदार आहे असं मी म्हणणार नाही. पण जर तिची यात काही चूक नसेल तर तिनं आपल्या पतीच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवायला हवी. कारण जर ती बोलली तर हे सर्व बंद होऊ शकतं.’
Source link