हायलाइट्स:
- भास्कर जाधव यांच्यावर पूरग्रस्त महिलेला धमकावल्याचा आरोप
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
- भास्कर जाधव यांनी आत्मचिंतन करावंः फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल चिपळूणमधील बाजारपेठेची पाहणी केली. पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. यावेळी व्यापाऱ्यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली. आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका. आमदार, खासदारांचा दोन महिन्यांचा पगार देऊ नका, पण आम्हाला मदत करा, असं एक महिला मुख्यमंत्र्यांना सांगत होती. महिलेचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलं व तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू, असं सांगितलं. त्याचवेळी तिथं असलेले भास्कर जाधव हेही बोलले. ‘आमदार, खासदारांच्या पगारानं तुमचं नुकसान भरून निघणार नाही. तुझ्या आईला समजाव,’ असं जाधव संबंधित महिलेच्या मुलाला म्हणाले. त्यावरून भास्कर जाधव यांनी दमदाटी केल्याचा आरोप होत आहे.
वाचाः भास्कर जाधव यांनी पूरग्रस्त महिलेला धमकावल्याचा आरोप, शिवसेना म्हणते…
याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांचं वर्तन धक्कादायक होतं, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ‘अशा संकटकाळात जनतेचा आक्रोश समजून घ्यायला हवा. जनता काही तुमच्या विरोधात बोलत नसतात. त्यांना तुमच्याकडून अपेक्षा असतात. अशावेळी त्यांना चूप करणं, त्यांच्या अंगावर जाणं, हे बरोबर नाहीये. त्यांचा आक्रोश समजून घेऊन त्यावर काय उपाययोजना करता येईल हे समजून घेतलं पाहिजे,’ असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
वाचाः कोल्हापूरचार दिवसांनंतर पुणे-बंगळुरू महामार्ग वाहतुकीसाठी खुला; ‘या’ वाहनांना असेल परवानगी
‘भास्कर जाधव हे सिनियर आमदार आहेत. ते मंत्रीदेखील राहिले आहे. अशा परिस्थितीत त्यांचं वर्तन मला योग्य वाटलं नाही. मला असं वाटतं या संदर्भात ते स्वतः आत्मचिंतन करतील,’ असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
वाचाः मृतदेहांची विटंबना होतेय; बचावकार्य थांबवा; तळीयेतील ग्रामस्थांची विनंती