Home ताज्या बातम्या दंडाची भीती कसली घालता?; कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संताप

दंडाची भीती कसली घालता?; कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संताप

0
दंडाची भीती कसली घालता?; कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संताप

कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संताप

रेल्वे, राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध असंतोष

प्रवास कसा करायचा, हा प्रवाशांचा सरकारला प्रश्न

म. टा. वृत्तसेवा, ठाणेः करोनाकाळात कित्येक महिने आम्ही रोजगाराविना काढले, आता काम मिळाले, तर लोकल प्रवासाला आडकाठी आहे. आम्ही दिवसाला काहीशे रुपये जेमतेम कमावतो. अशा लोकांना २५ हजार रुपयांच्या दंडाची भीती घालताना रेल्वे प्रशासनाला काही वाटायला हवे, अशा तीव्र संतापाच्या भावना अनेक कष्टकरी सध्या व्यक्त करत आहेत. केवळ नोकरी टिकवण्यासाठी विनातिकीट प्रवासाची जोखीम पत्करणाऱ्या कष्टकऱ्यांकडून जबर दंड वसूल करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या पवित्र्याबद्दल व प्रवासबंदीच्या राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरोधात नोकरदारांमध्ये प्रचंड असंतोष धुमसतो आहे. रेल्वेशिवाय दुसरा पर्यायच नसलेल्या ठिकाणांहून कामावर जाणाऱ्या गृहसेविका, सुरक्षारक्षक, रुग्णसेवक, शिपाई, स्वयंपाकी, कंत्राटी चतुर्थश्रेणी कर्मचारी या श्रेणीतील अनेक कष्टकरी सध्या दंडवसुलीमुळे मेटाकुटीस आले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंदच असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये असंतोष आहे. ठाणे जिल्ह्यातील कळवा, दिवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी उपनगरांमधील हजारो कर्मचाऱ्यांना मुंबईत ये-जा करण्यासाठी उपनगरी रेल्वे हाच एकमेव पर्याय आहे. इतरांनी बस, खासगी कार आदी पर्याय वापरून कार्यालयात अथवा कामाच्या ठिकाणी ये-जा करावी, अशी सरकारची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात परिवहन सेवा अत्यंत अपुरी आहे. मुंब्रा, दिवा, उल्हासनगर, टिटवाळा, आसनगांव आदी ठिकाणांहून मुंबईत ये-जा करण्यासाठी परिवहन सेवाच नाही. अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये नवी मुंबई परिवहनच्या काही फेऱ्या येत असल्या तरी त्या अत्यंत अपुऱ्या आहेत. जेमतेम दहा-बारा हजार रुपये महिने कमविणाऱ्या व्यक्तीने प्रवास कसा करावा, असा सवाल एका कंपनीत खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने उपस्थित केला. केवळ सरकारी अथवा अत्यावश्यक सेवेत नाही म्हणून रेल्वे प्रवास नाकारला जात असल्याबद्दल नोकरदार वर्गामध्ये सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष आहे.

नरेश चौधरी शहापूर तालुक्यातील किन्हवली येथून दररोज डोंबिवलीत नोकरीनिमित्त ये-जा करतात. येथील एका खासगी कंपनीत ते सुरक्षारक्षक आहेत. वर्षभर त्यांनी दुचाकीवरून प्रवास केला. आता कंपनीने अत्यावश्यक सेवेचे पत्र दिल्यानंतर रेल्वेने त्यांना पास दिला, परंतु तिकीट तपासनीसाने पकडले तर आमची जबाबदारी नाही, असे तिकीट देणाऱ्या कारकुनाने त्यांना सांगितले. त्यामुळे आता आसनगाव ते डोंबिवली असा लोकल प्रवास ते डोक्यावर टांगती तलवार घेऊन करीत आहेत.

मी मुलुंडला काही घरकामे करते. माझे पती चर्चगेटला हाउसकिपिंगचे काम करतात. मंगळवारी सकाळी टीसीने त्यांना दिवा स्टेशनवर पकडले. दंड भरावा लागेल, म्हणाले. तीन तास बसवून ठेवून २७० रुपयांची पावती फाडल्यावर त्यांना सोडले. आम्ही गुन्हेगार आहोत का? दीड वर्ष आम्ही सहन केले. आता आम्हाला चार पैसे कमवायला बाहेर जायला नको का? सरकार आमचा कधी विचार करणार ?

मयुरी भुरटे, घरकामगार, दिवा.

गेली सव्वा वर्षे आम्ही सरकारदरबारी निवेदने, आवाहने देत आहोत. परंतु या कामगारांबाबत कुणीही विचार करीत नाही. घरी बसून पोट कसे भरणार? उदरनिर्वाह, वीजबिल, घरभाडे कसे भरणार? सरकार मदत तर करीत नाही. किमान पोट भरण्यासाठी तरी प्रवासाची मुभा द्यावी.

संजीवनी नंनगारे, अध्यक्ष, घर कामगार संघटना

Source link