पाकला ठणकावले : पुन्हा ‘कारगिल’सारखी घुसखोरी करण्याची हिम्मत करू नका – रावत

- Advertisement -

नवी दिल्ली : काश्मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धाला शुक्रवारी २0 वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या आदल्याच दिवशी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकला ठणकावले. पुन्हा ‘कारगिल’सारखी घुसखोरी करण्याची हिम्मत करू नका, असा सज्जड दम रावत यांनी पाकिस्तानला भरला.

ते द्रास येथे बोलत होते. पाकिस्तानने असे दुश्कृत्य करण्याची खुमखुमी भविष्यात परत कधीच आणि कुठेही दाखवू नये. एवढेच नाही तर, पुन्हा असे करू शकू याचा विचारही पाकिस्तानने करू नये, असा दम जनरल रावत यांनी भरला. या युद्धाला शुक्रवारी २0 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभर ‘ऑपरेशन विजय’चा वर्धापन दिन सर्वत्र उत्साहाने साजरा होणार आहे. भारताच्या हद्दीतून पाकच्या प्रत्येक जवानाला हाकलून देण्यात भारतीय जवानांना २६ जुलै रोजी यश आले. त्यामुळेच विजय दिनाचे महत्त्व आहे. कारगिल दिनाच्या निमित्ताने तिथे लढलेल्या प्रत्येक जिवंत व हुतात्मा जवानाचे स्मरण उद्या केले जाणार आहे. यानिमित्ताने उरी हल्ल्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट महाराष्ट्रात ९0 हजार विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे. या दिनानिमित्त आज काश्मीरमध्ये जवानांनी प्रात्यक्षिकेही केली.

- Advertisement -