Home शहरे नागपूर नागपुरात साप पकडण्याचा व्यवसाय जोरात !

नागपुरात साप पकडण्याचा व्यवसाय जोरात !

नागपूर : पूर्वी साप दिसल्यास त्याला मारले जायचे. आता जनजागृतीमुळे आता साप दिसताच सर्पमित्रांना बोलावण्यात येते. हे लक्षात घेत काही सर्पमित्रांनी साप पकडण्याचा व्यवसायच बनविला आहे. शहरातील अनेक युवक पैसे कमविण्याच्या लालसेपोटी सर्पमित्र बनत आहे. काही सर्पमित्र साप पकडल्यानंतर ५०० ते १००० रुपये घेत आहे. पैसे न दिल्यास साप त्यांच्याच घरात सोडून देण्याची धमकी देत आहे. त्यामुळे सामान्य माणूस सर्पमित्रांची मागणी पूर्ण करीत आहे. अशा काही सर्पमित्रामुळे निस्वार्थ सेवा देणाऱ्या सर्पमित्रांची प्रतिमा खराब होत आहे.
वाठोडा परिसरात आठवड्याभरापूर्वी एका गरीब महिलेच्या घरात साप निघाला होता. महिलेने एका सर्पमित्राला बोलाविले. त्याने सापही पकडला. मात्र साप घेऊन जाण्यासाठी त्याने महिलेकडून एक हजार रुपयांची मागणी केली. त्या महिलेने पैसे देण्यास असमर्थतता दर्शविली. मात्र सर्पमित्राने साप घरातच सोडून देण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने उधार घेऊन सर्पमित्राला पैसे दिले.
साप मारल्याशिवाय पर्याय नाही
सूत्रांनी सांगितले की, कामठी परिसरातील काही गावांमध्ये साप निघाल्यानंतर लोक सर्पमित्राला बोलावित होते. सर्पमित्राने साप पकडल्यास पेट्रोलचा खर्च म्हणून स्थानिक रहिवासी त्यांना १०० ते २०० रुपये देत होते. परंतु आता काही नवीन सर्पमित्र त्यांच्या गावात साप पकडण्यासाठी येतात. हे सर्पमित्र गावकऱ्यांकडून मनमानी पैशांची मागणी करतात. त्यामुळे गावकऱ्यांनी सर्पमित्राच्या मागे धावणे बंद केले असून, स्वत:च सापाला मारत आहे.
 वन विभागाकडून पैसे मिळत नाही
नागरिकांचा भ्रम आहे की, साप पकडल्यानंतर सर्पमित्रांना वन विभागाकडून मानधन दिले जाते. परंतु सर्पमित्रांना अशी कुठलीही रक्कम मिळत नाही.
 आम्ही फीडबॅक सुद्धा घेतो
विदर्भ सर्पमित्र समितीचे अध्यक्ष मोनू सिंह म्हणाले की, त्यांना बरेचदा नागरिकांकडून साप पकडल्यानंतर हजार रुपये मागितल्याच्या तक्रारी मिळाल्या आहे. अशा सर्पमित्रावर वन विभागाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. आम्ही आपल्या सदस्यांना स्पष्ट सांगतो की, हे काम पैसे घेऊन करायचे नाही. कुणी जर पेट्रोल खर्च म्हणून १००, २०० रुपये दिले तर ठीक. अन्यथा नाही दिले तरी मानव व साप वाचविण्याचे सामाजिक काम करायचे आहे. आम्ही कॉल आल्यानंतर सर्पमित्राला पाठवितो, त्यानंतर संबंधित व्यक्तीचा फीडबॅक सुद्धा घेतो.