Home शहरे पुणे चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिर पाण्यात : नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिर पाण्यात : नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चिंचवड:  शहरासह मावळ भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे चिंचवड भागातून जाणाऱ्या पवना नदीच्या पात्राचे पाणी चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरात शिरले आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. पाणी पाहण्यासाठी अनेक जण य भागात गर्दी करित असून नदी काठच्या सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच भागातील केजुबाई मंदिर व रावेत बंधारा परिसर पाण्याने व्यापला आहे. 
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मावळ भागासह शरातील सर्वच भागातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.पालिका प्रशासनाने यासाठी नदी काठच्या नागरिकांना सतर्क केले असून अनेकांनी सुरक्षित स्थळी व्यवस्था केली आहे. आज सकाळी चिंचवड गावातील श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात पवना नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे.यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मंदिरातील पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करित आहेत. मंदिर व्यवस्थापन व चिंचवड पोलिसांनी या भागात बंदोबस्त ठेवला आहे. 
पवना नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सेल्फी काढण्याचा मोह आवरता घ्यावा.तसेच स्टंटबाजी करू नये अशा सूचना चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनीं नागरिकांना दिल्या आहेत.पालिका प्रशासनाने नदी काठच्या भागात यंत्रणा सज्ज केली आहे.पावसाचा जोर वाढल्यास पाण्याची पातळी अजून वाढू शकते या साठी नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना आपत्ती व्यवस्थपन अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.