भेसळ प्रकरणी कोकळे येथील दर्गेश्वर दूध संकलन केंद्रावर कारवाई

- Advertisement -

सांगली : अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील मे दर्गेश्वर दूध संकलन केंद्रावर धाड टाकली. भेसळ प्रकरणी कोकळे येथील दर्गेश्वर दूध संकलन केंद्रावर कारवाई करण्यात आली.

या धाडीमध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरत असलेले साहित्य, स्किम्ड मिल्क पावडर, लॅक्टोज पावडर व कमानी कीस्प रिफाईन्ड पाम करनेल तेल या अपमिश्रकांचा साठा व दुध 396 लिटर असा एकूण 1045 कि.ग्रॅ. चा 1 लाख 47 हजार 356 रूपये किंमतीचा साठा आढळून आला.

भेसळयुक्त गाय दुध व म्हैस दुध यांचे नमुने घेवून उर्वरित साठा नष्ट करण्यात आला. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे देण्यात आली. जप्त केलेल्या अपमिश्रकांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सदर पेढरीची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके, मेघना पवार व नमुना सहायक चंद्रकांत साबळे यांनी केली.

- Advertisement -