हायलाइट्स:
- आदित्य ठाकरेंविषयी बोलताना नीतेश राणेंचा तोल सुटला
- आक्षेपार्ह वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये संताप
- नीतेश राणेंनी ट्वीट करत शब्द घेतले मागे
१२ आमदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ भाजपनं विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रति विधानसभा भरवली होती. त्या भाग घेताना अनेक आमदारांनी सरकारवर टीका केली. शिवसेना व मुख्यमंत्र्यांना सातत्यानं लक्ष्य करणाऱ्या नीतेश राणे यांनाही प्रति विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी नीतेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी बोलताना नीतेश राणेंचा तोल गेला. आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे आज तीव्र पडसाद उमटले. मुंबईत शिवसैनिकांनी रस्त्यावर येत नीतेश राणे यांचा पुतळा जाळला व माफीची मागणी केली. भविष्यात तोंड सांभाळून बोलावं, असा इशाराही दिला.
वाचा: राज्यपालांनी १२ सदस्यांची यादी दाबून ठेवली ती लोकशाहीची हत्या नाही का?; शिवसेनेचा सवाल
हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन नीतेश राणे यांनी ट्वीट करत आपले शब्द मागे घेतले आहेत. ‘विधान भवनाबाहेर काल भाषण करताना आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मी जे बोललो, त्याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे. माझ्या वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माझे शब्द मागे घेतो. वैयक्तिक टीका करण्याचा माझा हेतू नव्हता, असं नीतेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
वाचा: उद्धव ठाकरेंची दिलीप कुमार यांना आदरांजली; जुन्या आठवणींना दिला उजाळा