Home बातम्या Aarey Forest : २६४६ झाडांच्या मृत लाकडांची आऽऽरेऽऽ मेट्रो

Aarey Forest : २६४६ झाडांच्या मृत लाकडांची आऽऽरेऽऽ मेट्रो

0

मुंबई: आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस मध्यरात्रीच सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आरेतील वृक्षतोडीविरोधात विरोधक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मृत लाकडांची मेट्रो असं ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.राष्ट्रवादीने एक चित्र काढत मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीविरोधात राज्य सरकारवर ट्विट करत टीका केली आहे. यामध्ये वृक्षतोडल्यानंतर लाकडांचा जो खच तयार होतो, त्याची मेट्रो तयार करुन आssरेs मेट्रो असं नाव देत वृक्षतोडविरोधात सरकारवर निशाणा साधला आहे.

काय आहे आरेचा वाद? काय काय घडलं गेल्या 24 तासांत?

मुंबई उच्च न्यायालयाने गोरेगाव येथील आरे मेट्रो कारशेडविरोधात दाखल याचिका शुक्रवारी फेटाळल्या. त्यानंतर रात्री मेट्रो कारशेडसाठी येथे वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली. याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. वृक्षतोडीला विरोध दर्शवत येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत निषेध केली. रात्री उशिरापर्यंत वृक्षतोडीच्या विरोधासाठी पर्यावरणप्रेमींची गर्दी वाढतच गेली. अखेर पोलिसांनी यातील काही पर्यावरणप्रेमींना ताब्यात घेतले. दरम्यान, येथे दोनशेहून अधिक झाडे तोडण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. येथील वृक्षतोडीला विरोध म्हणून गेले काही रविवार पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतरही हा विरोध कायमच असल्याचे चित्र शुक्रवारी रात्री पुन्हा पाहायला मिळाले.