Home बातम्या राष्ट्रीय Ahmednagar Lockdown Update: ‘या’ शहरात उद्यापासून कडक लॉकडाऊन; आज दिसले ‘हे’ धक्कादायक चित्र

Ahmednagar Lockdown Update: ‘या’ शहरात उद्यापासून कडक लॉकडाऊन; आज दिसले ‘हे’ धक्कादायक चित्र

0
Ahmednagar Lockdown Update: ‘या’ शहरात उद्यापासून कडक लॉकडाऊन; आज दिसले ‘हे’ धक्कादायक चित्र

हायलाइट्स:

  • नगर शहरात ३ ते १० मे या काळात कडक लॉकडाऊन.
  • भाजी आणि किराणा खरेदीसाठी नागरिकांची झुंबड.
  • गर्दीवर पोलीस आणि महापालिकेच्या पथकांचे नियंत्रण नाही.

नगर: कडक निर्बंधांचा दुसरा टप्पा सुरू होऊनही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने ३ ते १० मे या काळात अहमदनगर शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात औषध दुकाने व सकाळी दूध विक्री सुरू राहणार असून किराणा, भाजीपाल्यासह सर्व दुकाने बंद राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली. या निर्णयामुळे आज रविवारी भाजी आणि किराणा खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. सर्व निर्बंधांचा फज्जा उडविणाऱ्या या गर्दीकडे पोलिस आणि महापालिकेच्या पथकांनाही नियंत्रण ठेवता आले नाही. ( Ahmednagar Lockdown Latest News )

वाचा: तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका!; CM ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश

नगर जिल्ह्यात नव्याने आढळून येणाऱ्या करोना बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात ४ हजार २१९ नवे रुग्ण आढळून आले. त्यातील ८१७ रुग्ण एकट्या नगर शहरातील आहेत. त्यामुळे आयुक्त गोरे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर गर्दी होणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. भाजी आणि किराणा खरेदीसाठी जास्त गर्दी होत असल्याचे लक्षात घेता १० मे पर्यंत लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. नगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीचे लिलाव आणि विक्रीही बंद ठेवण्यात येणार आहे. त्याऐवजी हे काम नेप्ती येथील उपबाजार समितीतून होणार आहे. शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.

वाचा: महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ची शक्यता; संजय राऊत म्हणाले…

शहरात किराणा आणि भाजीपाल्याची विक्री बंद राहणार आहे. केवळ दूध विक्री सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहणार आहे. काल रात्री हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच भाजीपाला आणि किराणा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळी. हा एकच दिवस तोही अकरा वाजेपर्यंतच वेळ असल्याने भाजी बाजार आणि किराणा दुकानांत तोबा गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. महापालिकेची दक्षता पथके आणि पोलिसांनाही गर्दीला आवर घालता आला नाही.

दरम्यान, आयुक्तांच्या या निर्णयाला विरोध होत आहे. हा निर्णय अचानक जाहीर करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचे आणि त्यामुळे अचानक गर्दी उसळल्याने हेतू साध्य होणार असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना बंदी करण्यासही विरोध आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने फोन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नागरिकांकडून आयुक्तांना फोन आणि संदेश पाठवून या निर्णयाला विरोध दर्शविण्यात येत आहे. मनपा हद्दीतील शेतक-यांनी पिकवलेला भाजीपाला महानगरपालिकेने खरेदी केंद्र सुरू करत त्यामार्फत खरेदी करुन मनपा हद्दीत झोपडपट्टीत तसेच गरजू नागरिकांना वाटप किंवा विक्री करावा. यामुळे शेतक-यांनाही हातभार लागेल व नागरिकांचीही गैरसोय होणार नाही. लॉकडाऊन करताना नागरिकांना पर्याय दिला पाहिजे, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात येत असल्याचे महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते भैरवनाथ वाकळे यांनी सांगितले.

वाचा: एकाच गावात ४५ घरांची पडझड; ‘या’ जिल्ह्यावर कोसळलं दुहेरी संकट

Source link