हायलाइट्स:
- पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत बैठक.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्त्वाचे निर्देश.
- नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध
वाचा: ‘लग्नातल्या वरमाईप्रमाणे रुसून बसण्याचा प्रकार पुण्याच्या महापौरांनी बंद करावा’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. पुणे महापालिका हद्दीतील म्हाडाच्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या, तसेच हद्दीत समाविष्ट गावांमधील शाळा, अंगणवाड्या पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे पाणीयोजनांचे हस्तांतर तसेच पुणे महानगरपालिका विकास आराखड्यातील बालग्राम प्रमाणेच अग्रसेन शाळेची जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केली. पुणे शहराच्या जलद व सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी बैठकीत केला.
वाचा: टायगर आता काँग्रेसमय झालाय!; नाना पटोले यांचाही शिवसेनेला टोला
बैठकीला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार सुनील टिंगरे, पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार (व्हिसीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (व्हिसीद्वारे) आदींसह वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
वाचा: शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; चर्चा अनिल देशमुखांबाबत की…
आमंत्रणावरून मानापमान
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे या बैठकीला उपस्थित नव्हते. ‘मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे’, असे ट्वीट करत मोहोळ यांनी आमंत्रण नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र मोहोळ यांना या बैठकीचं आमंत्रण होतं, असं पुराव्यानिशी राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री कार्यालयातून मोहोळ यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची प्रत राष्ट्रवादीनं सोशल मीडियात शेअर केली. राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्याचा दाखला देत मोहोळ यांचे आरोप फेटाळून लावले. यामुळेही ही बैठक चर्चेत राहिली.
वाचा: ‘फडणवीस म्हणजे खोटं बोलण्याची मशीन; जनताच त्यांना संन्यास देईल’