हायलाइट्स:
- अनिल देशमुख यांनी पुन्हा परमबीर सिंग यांना केले लक्ष्य.
- अँटिलिया स्फोटकं प्रकरणी सिंग यांची चौकशी व्हावी.
- माझ्यावरील खंडणीवसुलीचा आरोप सूडभावनेतून: देशमुख
वाचा: आज राज्यात ५१,८८० नव्या करोना रुग्णांचे निदान, मृत्यू ८९१
परमबीर सिंग यांनी माझ्यावर खंडणीवसुलीचा जो आरोप केला आहे त्याला कोणताही आधार नसून सूडभावनेतूनच त्यांनी माझ्याविरोधात हे आरोप केले आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी केला. नागपूर विमानतळाबाहेर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबतही त्यांनी माहिती दिली. अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटके आणि नंतर मनसुख हिरन याची झालेली हत्या या दोन्ही घटनांत परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद होती. त्यांनी ज्या चुका केल्या त्या माफ करण्यासारख्या नव्हत्या. म्हणूनच मी गृहमंत्री म्हणून तेव्हा लगेचच परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली केली. नंतर एका जाहीर कार्यक्रमात बोलताना परमबीर यांना गंभीर चुकांमुळेच हटवण्यात आल्याचे मी बोललो होतो. त्याच्या रागातूनच परमबीर यांनी माझ्यावर खंडणीवसुलीचे आरोप केले, असेही देशमुख यांनी नमूद केले.
वाचा: करोनाची दुसरी लाट ओसरतेय!; ‘या’ जिल्ह्यात रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर
परमबीर यांना माझ्यावर आरोप करायचे होते तर त्यांनी आयुक्तपदावर असतानाच आरोप करायला हवे होते. पण तसे त्यांनी केले नाही. अँटिलिया प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून काढून एटीएसकडे दिल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले. त्यामुळेच त्यांचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट होते, असे नमूद करत या संपूर्ण बाबतीत मला न्याय मिळावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे देशमुख यांनी सांगितले. ३० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही, असेही देशमुख यांनी सांगितले.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू आहे. सीबीआयने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे घर तसेच अन्य ठिकाणीही छापे टाकले आहेत. ही कारवाई थांबवण्यात यावी व सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका देशमुख यांनी हायकोर्टात केली आहे. या याचिकेवर याच आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
वाचा: मोठी बातमी: मुंबईत रिकव्हरी रेट ९० टक्के; आज २,५५४ नवे करोना बाधित