हायलाइट्स:
- अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमुळं महाविकास आघाडीत अस्वस्थता
- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची ईडीवर प्रश्नांची सरबत्ती
- ईडीची चौकशी राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा केला आरोप
देशमुख यांच्यावरील कारवाईच्या अनुषंगानं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी ईडीला काही प्रश्न विचारले असून त्यांची उत्तरं मागितली आहेत. उरण येथील जमीन २००५ मध्ये खरेदी केली गेली आणि तिची किंमत २.६७ कोटी रुपये आहे असं ईडी स्वत: म्हणते आहे. मग मीडियामध्ये येणाऱ्या ३०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या वावड्यांवर ईडीचा अजूनही विश्वास आहे का? वरळी येथील फ्लॅटची किंमत २००४ मध्येच दिली गेली होती, १६ वर्षांपूर्वी केलेल्या व्यवहाराचा आताच्या प्रकरणाशी संबंध कसा जोडला जाऊ शकतो?,’ असे प्रश्न सावंत यांनी देशमुख यांच्या मालमत्तेच्या चौकशी संदर्भात केले आहेत.
वाचा: मुख्यमंत्र्यांचा खास माणूस ईडीच्या रडारवर; चंद्रकांत पाटलांनी घेतले नाव
याशिवाय, सचिन वाझे व परमबीर सिंग यांच्या आरोपांच्या अनुषंगानंही सावंत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘डान्स बारच्या मालकांनी वाझे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना ४.७० कोटी रुपये दिले, असं ईडीचं म्हणणं आहे. तसं असेल तर अशी लाच देणारे बार मालक अद्याप गजाआड का नाहीत? अनिल देशमुख यांनी कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले असल्याची माहिती असूनही परमबीर सिंग यांनी कुठलीही कारवाई केली नाही. ती का केली गेली नाही? अयोग्य गोष्टी निदर्शनास येऊनही कायदेशीर कारवाई न करणाऱ्या परमबीर सिंग यांची चौकशी का केली जात नाही?,’ असा सवालही सावंत यांनी ईडीला केला आहे.
ईडीनं अद्याप यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. त्यामुळंच या सर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशानं आणि महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करण्यासाठी राजकीय हेतूनं केल्या जात आहेत या आमच्या म्हणण्याला बळ मिळत आहे,’ असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
वाचा: शिवसेनेनं मोहरा फोडला; मनसे ‘असं’ देणार प्रत्युत्तर