हायलाइट्स:
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या.
- देशमुख यांची पत्नी आरती देशमुख यांना ईडीचे समन्स.
- मुलगा ऋषिकेश यालाही बजावले होते समन्स.
वाचा: शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार?; संजय राऊत यांनी केले मोठे विधान
मनी लॉण्डरिंग प्रकरणी आरती देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले आहे. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी याबाबत आज माहिती दिली. आरती देशमुख यांना दोन दिवसांपूर्वी समन्स मिळाले असून उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आलेले आहे. त्याआधी देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यालाही या प्रकरणी समन्स बजावण्यात आले होते, असे घुमरे यांनी सांगितले.
वाचा: शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी?
आरती देशमुख या गृहिणी आहेत. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे नमूद करताना अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी निरर्थक असल्याचे घुमरे म्हणाले. सध्या अटकेत असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या जबाबाच्या आधारावर ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. वाझे याचे प्रतिज्ञापत्र आणि सीबीआय व ईडीकडे दिलेल्या जबाबात तफावत आहे. अनिल देशमुख किंवा त्यांचे पीए कुंदन शिंदे यांना पैसे दिले नाहीत, असे त्याने स्पष्टपणे नमूद केले होते, याकडेही घुमरे यांनी लक्ष वेधले. ही चौकशी योग्य पद्धतीने सुरू नसल्यानेच अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. आरोपांवर आधारित ही चौकशी असून जी कागदपत्रे मागितली जात आहेत त्यांची पूर्तता आम्ही करत आहोत, असेही घुमरे यांनी स्पष्ट केले. परमबीर सिंग यांच्या आरोपांत तथ्य नाही. तुम्ही इतके महिने गप्प का होता, असे तर उच्च न्यायालयानेही त्यांना विचारलेले आहे, असे घुमरे यांनी नमूद केले.
अनिल देशमुख यांचं वय व सध्याची एकंदर स्थिती लक्षात घेता त्यांची ऑनलाइन चौकशी व्हावी. त्यासाठी ते तयार आहेत. अशी मागणी आम्ही ईडीकडे केलेली आहे, असे नमूद करताना अशी कोणती बाब आहे ज्यासाठी तुम्ही त्यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलावत आहात?, असा सवाल घुमरे यांनी ईडीला केला.
वाचा: काँग्रेसवर शरसंधान; पटोलेंच्या वक्तव्यांच्या निमित्ताने पवारांचा नेत्यांना संदेश