हायलाइट्स:
- शहरात लसीकरण केंद्रांवर राजकीय पक्षांचे बॅनर्स आणि होर्डिंग्जबाबत पोलिसांकडे तक्रारी येऊ लागल्या आहेत.
- याची दखल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी घेतली आहे.
- लसीकरण केंद्रांवर लावण्यात आलेले राजकीय बॅनर्स आणि होर्डिंग्ज काढून टाका असे स्पष्ट आदेश आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
लसीकरण केंद्रांवर अशा प्रकारच्या अनुचित जाहिराती करणे योग्य नाही. ते वस्तुस्थिती आणि सौजन्याला धरून नसल्याचे चहल यांनी म्हटले आहे. लसीकरण केंद्रांवर नगरसेवकांपासून ते आमदार आणि खासदार किंवा इतरही कुणी जर बॅनर्स किंवा होर्डिंग्ज लावले असतीस आणि विनंती करूनही जर ते काढले जात नसतील तर ते काढून टाकण्यात यावेत, असे आदेश चहल यांनी दिले आहेत.
लसीकरण केंद्रांवर लावण्यात आलेल्या जाहिराती, बॅनर्स किंवा होर्डिंग्जबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याचेही चहल यांनी म्हटले आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर करोना प्रतिबंधक लसीकरण हा लोकांमधील प्रचाराचा एक भाग बनत चालला आहे का, असे या बॅनर्स आणि होर्डिंग्जवरून वाटत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे लसीकरण केंद्रावर लसीकरणाबाबतची माहिती देणाऱ्या फलकांऐवजी राजकीय नेत्यांचे बॅनर्स आणि होर्डिंग्ज प्रथम नजरेत भरतात आणि कामाचे फलक मात्र झाकोळले जातात अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
क्लिक करा आणि वाचा- ‘हे नारायण राणे यांना समजत नाही का?’; अजित पवार संतापले
दरम्यान मुंबईत ३२३ सक्रिय कोविड लसीकरण केंद्रे आहेत. यांपैकी ७९ लसीकरण केंद्रे ही खासगी रुग्णालयांमध्ये आहेत. तर, २० लसीकरण केंद्रे ही शासकीय रुग्णालयांमध्ये आहेत. मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक वॉर्डात एक लसीकरण केंद्र सुरू केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- लसीकरण: मुंबई महापालिकेचं ग्लोबल टेंडर रद्द, सर्व कंपन्या ठरल्या अपात्र
क्लिक करा आणि वाचा- हे तर सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण; फडणवीसांनी साधला निशाणा