आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याबाबत पक्षाकडे अर्ज करण्याच्या मुदतीत राष्ट्रवादीचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी अर्ज भरला नाही. त्यामुळे लांडे विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविणार नसल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, भोसरीतून विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक पंडित गवळी आणि दत्तात्रय जगताप यांनी इच्छूक असल्याचे पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सूचनेनुसार आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दिनांक 1 जुलै 2019 पर्यंत उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात जमा केले आहेत. त्यामध्ये पिंपरी विधानसभेतून आठ, चिंचवड विधानसभेतून सात आणि भोसरी विधानसभेतून तीन असे तिनही विधानसभा मतदारसंघातून एकूण अठरा उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठविले जाणार आहेत.
- भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढविण्याबाबत इच्छूक असल्याचा अर्ज पक्षाकडे दिला नाही. त्यामुळे लांडे राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे जवळपास निश्चित आहे.
भोसरीत काही दिवसांपुर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात आपण इच्छूक नसल्याचे लांडे यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यावर पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत हल्ली राजकारणात आपण इच्छूक नसल्याचे सांगणारे कमी आहेत. लांडे यांच्याकडून प्रेरणा घेत आपण देखील इच्छूक नसल्याची दिलखुलास प्रतिक्रिया पवार यांनी दिली होती.
- दरम्यान, भोसरी मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. 2009 आणि 2014 च्या दोनही निवडणुकीत भोसरीकरांनी अपक्षाच्या बाजूनेच कौल दिला होता. आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत लांडे अनेकवेळा अपक्षच निवडून आले आहेत. त्यामुळे 2019 ची विधानसभा निवडणूक देखील लांडे अपक्ष लढणार असल्याची जोरदार चर्चा भोसरीत सुरु झाली आहे.