Home अश्रेणीबद्ध Bhosari : हवाईदल भरतीवरील अनावश्यक खर्च टाळा – दत्ता साने

Bhosari : हवाईदल भरतीवरील अनावश्यक खर्च टाळा – दत्ता साने

भोसरीतील गावजत्रा मैदानावर हवाईदलाच्या भरतीसाठी मुलभूत सुविधा पुरविण्याच्या नावाखाली महापालिकेचा निधी घेऊन स्थानिक आमदारांनी ‘इलेक्‍शन फंड गोळा’ करण्याचा उद्योग सुरू केला असल्याची टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. या भरतीसाठी होणारा महापालिकेचा अनावश्‍यक खर्च टाळण्याची विनंतीही साने यांनी आयुक्तांना केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, भारतीय हवाई दलाच्या वतीने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि गावजत्रा मैदानावर भरती अभियान राबवत आहे. आमदारांनी त्यांच्यांशी निगडीत असलेल्या संस्थांच्या संयुक्‍त विद्यमाने हे अभियान राबविले जात असल्याचे फ्लेक्‍स शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. या भरती अभियानासाठी महापालिका सुविधा पुरविणार असून, त्यासाठी 50 लाख रुपये दिले आहेत. मात्र, या अभियानाचे आयोजन आमदारांशी निगडीत तीन संस्था करत असल्याची जाहिरात केली आहे.

ही जनेतची दिशाभूल असून भारतीय हवाई दलाने सदर कार्यक्रमासाठी मदतीची मागणी केली होती का ? केली नसल्यास मनपाने कोणत्या आधारावर ही मदत केली आहे ? हा खर्च कोणाच्या सांगण्यावरुन अथवा परवानगीने केला जात आहे ? याची सविस्तर माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या भरती अभियानामुळे शहरातील युवकांना चांगल्या करिअरची संधी मिळणार आहे. त्यामुळे या अभियानाला माझा अजिबात विरोध नाही. परंतु, या अभियानाचे आयोजन करण्याचे श्रेय लाटण्याला माझा ठाम विरोध आहे, असेही साने यांनी म्हटले आहे.