हायलाइट्स:
- बिग बॉस १५ मधील सहभागाबद्दल अंकिता लोखंडेने दिली प्रतिक्रिया
- सोशल मीडियावर पोस्ट करत मांडली भूमिका
- पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वात दिसणार अंकिता लोखंडे
काय लिहिले आहे अंकितानेगेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १५’ कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चांवर अंकिताने तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त केली आहे. तिने लिहिले, ‘बिग बॉस’ च्या १५ व्या पर्वामध्ये मी सहभागी होणार असल्याच्या बातम्या अनेक मीडिया रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. या सर्व बातम्या खोट्या आणि बिनबुडाच्या आहेत. मी बिग बॉस कार्यक्रमात सहभागी होणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. मी बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या बातम्या आल्यानंतर मला सातत्याने द्वेषपूर्ण मेसेज अनेकजण पाठवत आहेत. त्यांनी प्रतिक्रिया देण्यास खूपच घाई केली असे मला वाटते. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याबाबतच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्या संपूर्ण खोट्या आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका.’
गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस १५’मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. यामुळे सोशल मीडियावरून अनेक युझर्सनी अंकितावर टीका केली होती. अंकिता केवळ प्रसिद्धीसाठी आता ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होऊन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या मुद्दयावर लोकांचा सपोर्ट मिळवणार अशा चर्चा होत होती. मात्र आता अंकिताने तिची प्रतिक्रिया व्यक्त केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सहा महिने चालणार बिग बॉस १५
दरम्यान, बिग बॉसचे १५ वे पर्व ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. यंदा हे पर्व तीन महिन्यांऐवजी सहा महिने चालणार आहे. त्याचबरोबर कलाकारांसोबत सर्वसामान्य लोकांनाही बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, अंकिताच्या कामाबद्दल सांगायचे तर निर्माती एकता कपूरसोबत सध्या ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्ये काम करतेय. या कार्यक्रमाचे स्क्रीप्ट जवळपास तयार आहे. हा कार्यक्रम ओटीटीवर प्रसारित होणार आहे.