हायलाइट्स:
- ओटीटीवरील बिग बॉस १५ चे अँकरिंग सलमान खान करणार नाही
- अन्य कलाकाराकडे अँकरिंगची जबाबदारी सोपवली जाणार
- बिग बॉसच्या १५ व्या पर्वाबद्दल प्रेक्षक झालेत उत्सुक
बिग बॉस १५ हा कार्यक्रम वूट या ओटीटीवर ऑगस्टपासून प्रसारित केला जाणार आहे. सहा आठवड्यांनंतर हा कार्यक्रम टीव्हीवरून प्रसारित होणार आहे. बिग बॉसचे हे नवीन पर्व सुपरहिट करण्यासाठी निर्मात्यांनी विविध योजना आखल्या आहेत. त्यामध्ये बिग बॉसच्या नवीन पर्वामध्ये कलाकारांसोबत सर्वसामान्य नागरिकांनाही स्पर्धक म्हणून सहभागी होता येणार आहे. तसेच हा कार्यक्रम तीन महिन्यांऐवजी आता सहा महिने चालणार आहे. याशिवाय अनेक छोटेमोठे बदल कार्यक्रमात निर्मात्यांनी केले आहे. त्यामुळे कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
सिद्धार्थ शुक्ला करणार अँकरिंग?
ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिग बॉस चे १५ पर्व प्रसारित केले जाणार आहे. ओटीटीवरील या कार्यक्रमाचे अँकरिंग सिद्धार्थ शुक्लाकडे जाण्याची चर्चा आहे. सिद्धार्थ हा बिग बॉसच्या १३ व्या पर्वाचा विजेता आहे. सिद्धार्थसोबतच फराह खानच्या नावाचीही चर्चा आहे. अर्थात निर्मात्यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ओटीटीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचे अँकरिंग नेमके कोण करणार याबाबत सध्या तरी गुप्तता बाळगण्यात आली आहे.

दिव्या अग्रवाल बिग बॉसमध्ये येणार ?
बिग बॉसच्या १५ व्या पर्वामध्ये दिव्या अग्रवाल येण्याची शक्यता आहे. दिव्याचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. तिची सोशल मीडियावर असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन तिने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, यासाठी निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. दिव्याने या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत होकार कळवला आहे. अर्थात बिग बॉस च्या ११ पर्वामध्ये दिव्या तिच्या एक्स बॉयफ्रेंड प्रियांक शर्माला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात आली होती.
ओटीटीवर बिग बॉसची धम्माल
बिग बॉस १५ हा कार्यक्रम ओटीटीवरून सहा आठवडे प्रसारित केला जाणार आहे. या सहा आठवड्यांमध्ये बिग बॉसच्या या घरात कोण स्पर्धक टिकणार आणि कोण जाणार हे सर्व प्रेक्षकांच्या हातात असणार आहे. जे स्पर्धक यामध्ये शेवटपर्यंत टिकतील तेच टीव्हीवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात कुणाला प्रवेश मिळतो आणि कुणाला स्वतःच्या घरी जावे लागते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.