Home बातम्या राजकारण Breaking: कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळलं; बहुमत चाचणीत नापास

Breaking: कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळलं; बहुमत चाचणीत नापास

बंगळुरु: कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आहे. विधानसभेत घेण्यात आलेल्या बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. यामुळे काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी काही दिवसांपूर्वींच राजीनामा दिला होता. त्यानंतर कर्नाटकी नाट्य सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं. यानंतर अखेर आज कर्नाटकच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात कुमारस्वामींना मोठा धक्का बसला. आता यापुढे कर्नाटकात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कर्नाटक विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यात काँग्रेस, जेडीएसच्या बाजूनं ९९ आमदारांनी मतदान केलं. तर १०५ मतं सरकारच्या विरोधात गेली. त्यामुळे आता कुमारस्वामींना सत्ता सोडावी लागेल. त्याआधी कुमारस्वामींनी राज्यातील जनतेची माफी मागितली. ‘विश्वासदर्शक ठराव पुढे ढकलण्यात मला रस नाही. मी अपघातानं मुख्यमंत्री झालो. मी चांगलं काम करण्यासाठी आलो होतो. काँग्रेस-जेडीएस हे दोन पक्ष उत्तम प्रशासन देण्यासाठी एकत्र आले होते,’ असं भावूक भाषण कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याआधी केलं. चौदा महिन्यांपूर्वी काँग्रेस, जेडीएसनं कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली होती. विशेष म्हणजे भाजपा क्रमांक एकचा पक्ष असतानाही काँग्रेस, जेडीएसनं आघाडी करत सत्ता मिळवली. मात्र हे सरकार स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात होतं. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी राजीनामे दिल्यानं सरकार अडचणीत आलं. यानंतर आज कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यावेळी सदनात २०४ आमदार उपस्थित होते.