नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या देशातील सर्व कर्मचार्यांच्या जून महिन्याच्या पगारी शनिवारी काढण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर कंपनीने वेतनाचे ७०० कोटी रूपये, कर्जावरील ८०० कोटी रूपयांचे पेमेंट केले आहे. वीज बील आणि इतर ठेकेदारांची देय रक्कम देण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे.
सोमवारी कर्मचार्यांच्या खात्यात जमा होणार पगाराची रक्कम
अर्थ विभागातील एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएलच्या कर्मचार्यांच्या जून महिन्याच्या पगारासाठी लागणारी रक्कम प्राप्त झाली असून ती त्यांच्या खात्यावर सोमवारी जमा होणार आहे. भारत संचार निगम लिमिटेड अखिल भारतीय युनियनचे आयोजक पी. अभिमन्यू यांनी देखील त्याबाबत सांगितले आहे.
१४ हजार कोटीसाठी वेट अॅन्ड वॉच
बीएसएनएल कंपनीने एप्रिल महिन्यातच १४ हजार कोटी रूपयांची आवश्यकता असल्याबाबत दूरसंचार विभागास कळविले होते. मात्र, अद्यापही कंपनीला रक्कम मिळालेली नाही. म्हणून टेलिकॉम विभाग १४ हजार कोटी रूपयांसाठी वेटिंगवर आहे. बीएसएनएल कंपनीवर १५ हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे, जे दूरसंचार उद्योग क्षेत्रात सर्वात कमी आहे.
… म्हणून बीएसएनएल कंपनी तोटयामध्ये
वेतन आणि राजस्व मध्ये मोठे अंतर असल्याने कंपनी तोटयात आहे. बीएसएनएल कंपनीची निर्मिती झाल्यानंतर सरकारने मोठया प्रमाणावर इतर विभागातील कर्मचार्यांना कंपनीमध्ये स्थलांतरित केले होते.
AIGETOA कडून PM मोदींना पत्र
ऑल इंडिया ग्रॅज्युयट इंंजिनिअर्स अॅड टेलिकॉम ऑफिसर्स असोसिएशनने (AIGETOA) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून कंपनीवरील संकट दूर करण्याची तसेच कंपनीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्याची विनंती केली आहे. कंपनी चालु स्थितीत संकटात असल्याने त्याचा इतर बाबींवर मोठा परिणाम होत आहे.