हायलाइट्स:
- मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केल्यावर भाजपची टीका.
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा.
- मराठा आरक्षण कायदा रद्द होण्यास तुम्हीच जबाबदार: पाटील
वाचा: मराठा आरक्षणावर केंद्राने लगेच निर्णय घ्यावा!; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ही लढाई पुढे कशी नेली जाणार, यावरही मुख्यमंत्री बोलले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. ‘उद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, असे नाटक तुम्ही का करत आहात? ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही आणि यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार आहात’, असा तीरकस बाण पाटील यांनी सोडला.
वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला; CM ठाकरे यांनी केले मोठे विधान
‘काँग्रेस सोबत जोडल्या गेलेल्या १०० सधन कुटुंबांची मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी इच्छा आहे. आमच्या सारख्या गरीब कुटुंबांना या आरक्षणाची गरज होती पण काँग्रेस कधीही कोणालाही पुढे जाऊ देणार नाही. मराठा व्यक्तीच्या नावापुढे मागासवर्गीय लिहिलं जावं हे त्यांना नको आहे. आता शिवसेना सुद्धा केवळ सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या या कारस्थानात सामील झाली आहे, हे अतिशय वेदनादायी आहे’, असेही पाटील म्हणाले. स्वत:चं अपयश झाकण्यासाठी तुमच्याद्वारे केलं गेलेलं विधान मराठा समाजाला आक्रोशीत करत आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात एका न्यायाधीशासमोर आपली बाजू मांडू शकला नाहीत, याची शिक्षा आता संपूर्ण समाजाला भोगावी लागणार आहे, असेही पाटील म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मराठा आरक्षण कायद्यासंदर्भात निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हा राज्याचा अधिकार नसून तो राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. यातून एकप्रकारे पुढे जाण्याचा मार्ग दाखवला गेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आजच्या निर्णयाने पदरी निराशा पडलेली असली तरी ही लढाई संपलेली नाही. आता केंद्र शासनाने, राष्ट्रपतींनी यासंदर्भात निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या न्याय्य मागणीबाबत संवेदनशीलता दाखवावी. ॲट्रॉसिटी, काश्मीरचे ३७० कलम हटवणे किंवा शहाबानो प्रकरणात जसे महत्त्वाचे निर्णय घेऊन केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा केली त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात केले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.
वाचा: ‘सर्वोच्च’ कौतुक: मुख्यमंत्री ठाकरे यांनी लढवय्या मुंबईकरांना दिलं सारं श्रेय